Friday, March 29, 2024
Homeजिल्हाकिमान वेतन व पेन्शन च्या अंमलबजावणी साठी विडी कामगारांचा रखरखत्या उन्हात मोर्चा

किमान वेतन व पेन्शन च्या अंमलबजावणी साठी विडी कामगारांचा रखरखत्या उन्हात मोर्चा

रोख मजुरी न दिल्यास विडी कामगार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालतील – कॉ. आडम मास्तरांचा इशारा

सोलापूर : सोलापूर मध्ये मागच्या दहा वर्षात विडी कामगारांची संख्या जवळ जवळ 20 हजाराने घटली, या कामगारांचे जीवन उद्धवस्त झाले याची कसलीच चिंता या मायबाप कल्याणकारी सरकारला नाही. यातच बनावट विडी उत्पादनाचा सुळसुळाट सुरू आहे, धूम्रपान कायद्यामुळे विडी उद्योगावर संक्रात आली आहे. गुटखा, तंबाखू, दारू सिगारेट मुळे माणसे मरतात, संसार धुळीस लागतात यावर बंदी नाही पण जे शेकडो वर्षे कामगारांना रोजगार देणाऱ्या उद्योगावर निर्बंध का ? कामगारांना जिवंतपणी फस्त करण्याचा हा केंद्र आणि राज्य सरकारचा डाव असल्याची घणाघाती टीका केली. विडी कामगारांना रोख मजुरी न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालतील अशी सिंहगर्जना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केली.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न लाल बावटा विडी कामगार युनियन च्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक 1मार्च रोजी विडी कामगारांच्या विविध प्रलंबित न्याय हक्काच्या मागण्यासह व किमान वेतन व पेन्शन या प्रमुख मागण्या घेऊन दुपारी 3 वाजता दत्त नगर लाल बावटा कार्यालय पासून मोर्चेची सुरुवात होऊन आंध्र दत्त चौक मार्गे- पद्मशाली चौक,जिंदशहा मदार चौक किडवाई चौक यशोधरा हॉस्पिटल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे मोर्चेचा समारोप होऊन त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले.

दुपारी 12 वाजल्यापासून शहर व हद्दवाढ भागांतून विडी कामगार महिला दत्त नगर येथे दाखल होत होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. विडी कामगार लाल झेंडे घेऊन गगनभेदी आवाजात मागण्यांच्या घोषणा देत मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील झाले.

कामगार नेत्या कॉ.नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात अँड.अनिल वासम, विक्रम कलबुर्गी, सुनंदा बल्ला, शकुंतला पानिभाते, लिंगवा सोलापूरे आदींचा सहभाग होता.

यावेळी सभेला संबोधित करताना सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख म्हणाले की, विडी कामगारांना मिळणारी मजूरी किमान वेतनाप्रमाणे रु. २१० अधिक १२२.०३ स्पेशल अलौन्स, असे रु. ३३२.०३ मिळणे आवश्यक असताना आज फक्त रु. २०० इतके मिळतात. तर पेन्शन जास्तीत जास्त रु. १००० मिळते. आजच्या महागाईत इतक्या मजूरीवर कुटूंब चालविणे अथवा पेन्शनवर जगणे शक्य नाही.


विडी कामगारांच्या किमान वेतनाची फरकसहित अमलबजावणी करावी. यासाठी सोलापूर शहरातील १६९० विडी कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांचेकडे किमान वेतन अधिनियम १९४८ कलम २० व महाराष्ट्र किमान वेतन १९६३ चे नियम ३२ प्रमाणे सन २०१७ साली दाखल केले आहे. यातील सामानेवाला विडी उद्योग हजार होऊन सुद्धा आजतागायत त्यांचे म्हणणे मांडलेली नाही. मे. अॅथारिटी पुढे युनियनमध्ये प्रत्येक तारखेला पाठपुरावा करूनही मे. अॅथारिटी कोणताच निर्णयात्मक निर्णय विडी कामगारांच्या बाजूने घेत नसल्याने अद्याप या केसेसचा निकाल होत नाही. प्रत्येकवेळी काही न काही कारणाने टाळाटाळ होत आहे.

म्हणून राज्यातील विडी कामगारांच्या वतीने आज दि. १ मार्च २०२३ रोजी मा. सोलापूर जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कार्यालयावर विराट मोर्चाने आक्रोश व्यक्त करत असून खालील मागण्यांची योग्य त्या पातळीवर विचार होऊन त्वरित त्याची सोडवणूक करावी. अन्यतः राज्यातील सर्व विडी कामगारांचे आक्रमक आंदोलन करण्यात येईल. यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.

मोर्चातील प्रमुख मागण्या :

१. बिडी कामगारांच्या किमान वेतनाची फाराकांसहीत अंमलबजावणी व्हावी व सुधारीत किमान वेतन जाहीर करावे.
२. दि सिगारेट्स अंड अदर टोबको विधेयकाच्या सक्तीच्या अंमलबजावणी पासून विडी कामगारांना संरक्षण / सवलत द्यावी.
३. बँकेतून होणाऱ्या मजूरी ऐवजी दर आठवड्याला रोख मजूरी देण्यांत यावी.
४. विडी कामगारांना दरमहा पेन्शन रु. ९००० मिळावे.
५. विडी कामगारांसाठी राष्ट्रीय किमान वेतन दरहजारी रु. ३९५ राष्ट्रीय ग्राहक किंमत निर्देशीकांशी (१९६०=१००) च्या आधारे जोडून अधिक २५% सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जाहीर करावेत. महागाई भत्ता धरून वेतन देण्यांत यावे. तर उद्योगातील इतर कामगारांना दरमहा किमान रु. २१,००० वेतन द्यावे.
६. कामगार कायद्यातील बदल रद्द करून चार श्रम-संहिता रद्द कराव्यांत.
७. घरगुती वापराचे वीज बील वाढले असून त्यांत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. या दरवाढीतून कामगार व शेतकऱ्यांना वगळून त्यांना सवलतीच्या दरांवर वीजबील आकरणी करण्यांत यावी.
८. गुल्लाकट्टा, छाट विडया, खराब पानपुडा ही दुष्ट प्रथा बंद करून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.
९. ठेकेदारी पध्दत बंद करावी, नकली विड्यां उत्पादकांवर कठोर कारवाई करावी.
१०. सर्वांना पिवळे रेशन कार्ड, दरमहा माणसी ५ किलो धान्य मोफत द्यावे.
११. महागाईवर आळा घालावा व बेरोजगारांना काम द्यावे.

यावेळी मंचावर नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख(मेजर), फातिमा बेग, सिद्धप्पा कलशेट्टी, सुनंदा बल्ला, अँड.अनिल वासम आदी उपस्थित होते. या मोर्चाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले. मोर्चा यशस्वी होण्यासाठी ,विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, बापू साबळे, वीरेंद्र पद्मा, अशोक बल्ला, हसन शेख, अप्पाशा चांगले, रफिक काझी, राजू गेंट्याल, दीपक निकंबे, नागेश म्हैत्रे, बालाजी गुंडे, बाळकृष्ण मल्याळ, शाम आडम, मोहन कोक्कुल, दाऊद शेख, अकिल शेख, आसिफ पठाण, इलियास सिद्दीकी, दत्ता चव्हाण, अफसना बेग, मल्लेशम कारमपुरी, मल्लिकार्जुन बेलीयार, गोपाळ जकलेर, लक्ष्मीनारायण जोरीगल, सनी आमाटी आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय