अकोले तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जोडले नाते
अकोले : कोरोनामुळे सर्वच शहरी व ग्रामीण भागातील मुलांच्या खेळण्यावर मर्यादा आलेली असली तरी अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवाशी भागातील विद्यार्थी उपलब्ध साधनांचा वापर करून वेगवेगळे खेळ खेळताना दिसून येत आहेत. त्यापैकी एक आवडीच्या पावक्यावर मुले उभे राहून डौलात निसर्गासोबत मजा घेताना दिसून येत आहेत. त्यांच्याकडे पाहून इतरांनाही जगण्याची नवीन उमीद मिळाल्याशिवाय राहत नाही.
शाळा नसल्याने विद्यार्थी मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात खेळ खेळत आहेत. भंडारदरा धरणाच्या पश्चिम दिशेला वसलेल्या आदिवासी गावांमध्ये पांजरे, उडदावणे, घाटघर, कोलटेंभे, रतनवाडी, मुतखेल, मुरशेत आणि इतर आदिवासी गावांमधे पावका घेऊन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर खेळताना दिसून येत आहेत. या खेळाची मजा घेताना विद्यार्थी आपले देहभान विसरून निसर्गाच्या कुशीत आनंद घेत आहेत.
पावका म्हणजे जंगलातील सरळ वाढणाऱ्या झाडांच्या लाकडी दांड्याला दिलेला एक विशिष्ट आकार आहे. दांड्याला पाय ठेवण्यासाठी विशिष्ट जागा आहे. पावका तयार करण्यासाठी सागाच्या लाकडांचा वापर केला जातो. त्यामुळे पावका तुटून दुर्घटना होण्याची शक्यता कमी आहे. या खेळामध्ये विद्यार्थी आपल्याला पेलतील अशा आकाराचे दोन लाकडी खांब निवडतात. त्याला एकसारखे करून पाऊल ठेवण्यासाठी जागा बनवतात. त्या जागेवर विद्यार्थी पाय अलगद ठेवून एका ठराविक उंचीवर चालण्याचा आनंद घेत आहेत. पावक्यावर चालताना आदिवासी विद्यार्थी कुशलतेने व आत्मविश्वासाने आपली पावले टाकताना दिसून येत आहेत. या खेळामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग तोल सांभाळणे आहे. आदिवासी विद्यार्थी खासकरून ठाकर समाजाची मुले तो तोल अलगत सांभाळत आहेत.
संपादन – संदिप अंबेकर