बगदाद : इराकच्या दक्षिणेकडील शहर नासिरियातील अल-हुसैन कोविड रुग्णालयात सोमवारी भीषण आग लागली. या भीषण आगीत 44 लोकांचा मृत्यू झाला असून 67 लोक जखमी झाले आहे. ही आग कोविड वार्डातील ऑक्सिजन टँकमध्ये स्फोट झाल्याने घडली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून मदत व बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, या घटनेमध्ये मृतांच्या आकड्यांत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांनी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीदरम्यान, पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांनी नसीरिया रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थापकांना अटक निलंबित करत अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता
घटनेदरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांनी अनेक जळत्या मृतदेहांना बाहेर काढले. बाहेर काढलेल्या रुग्णांना धुरामुळे मोठ्या प्रमाणात खोकला येत आहे. या घटनेचा तपास सुरु असून आग नेमकी कशी लागली याचा शोध सुरु आहे. या घटनेत आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.