मुंबई : ज्येष्ठ लेखक, प्रसिद्ध नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांचे निधन झाले आहे. ते ६१ वर्षांचे होते. शनिवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे व मुलगी असा परिवार आहे.
जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. जयंत पवार यांना ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट लेखनासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले होते. महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते.