नंदुरबार: गुजरातमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे तिथे नेमके इंधनाचे दर किती दिवस स्थिर राहतात, याकडे संपूर्ण देशाची नजर लागली आहे. एकूण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनांच्या दरांचा मतांवरही परिणाम होण्याची शक्यताही असते. त्यामुळे इंधनाचे दर आवाक्यात ठेवणं, हे सरकारसमोरचंही मोठं आव्हान असणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात 110.91 रुपये पेट्रोलचे दर आहेत. तर डिझेलचा दर 94 रुपये 69 पैसे आहे. नंदूरबार जिल्हापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरात राज्यात पेट्रोल 96 रुपये 99 पैसे तर डिझेल 89 रुपये दरानं विकलं जातंय. त्यामुळे नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक नागरिक गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी जात आहेत.
गुजरात मधील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी वाहन धारकांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळतायत. तर गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरील महाराष्ट्र राज्यामधील पेट्रोल पंप ओस पडलेत.
महाराष्ट्रातील कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांत पेट्रोलचे दर हे जवळपास 111 रुपयांच्या आसपास आहेत. तर डिझेलचे दरही लवकरच शंभरीपार जातील की काय अशी भीती महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापुरात डिझेलचे दर हे 94 ते 95 रुपयांच्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत पेट्रोलची झालेली दरवाढ ही अनेक गोष्टींवर परिणाम करते. त्यामुळे भाज्य, फळ, धान्य यांचेही दर वाढण्याची दाट शक्यता आहे. अशात नंदुरबारसह गुजरातच्या सीमेलगतच्या भागातील राज्यातील जनता गुजरातमध्ये स्वस्त पेट्रोल खरेदीसाठी पसंती देत असल्याचं बघायला मिळतंय.