Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यावंचित आघाडीची महाविकास आघाडीसोबत अद्याप युती नाही, वंचितने कार्यकर्त्यांना दिल्या 'या' महत्त्वाच्या...

वंचित आघाडीची महाविकास आघाडीसोबत अद्याप युती नाही, वंचितने कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

मुंबई : महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी करत आहे. निवडणुकीची तयारी करत असतानाच मविआ नेते राज्यातल्या भाजपाविरोधी पक्षांना आणि नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून कधी अटी शर्ती तर कधी अधिक जागांची मागणी केली जात आहे.

महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी आग्रही आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर देखील भाजप-आरएसएस विरोधात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत असताना मात्र आम्ही स्वतंत्र लढलो तरी किमान ६ जागा जिंकू शकतो या आंबेडकरांच्या भूमिकेने सगळ्यांना बुचकळ्यात पाडले आहे. अशात वंचित कडून कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोशल मीडिया एक्सवर, वंचित बहुजन आघाडीने सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये.

नागपूर मध्ये रवी भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपात कॉंग्रेस आणि शिवसेनेत तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे त्यांचे जागावाटप होत नाही. त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. यात सन्मानजनक तोडगा न काढल्यास आम्ही स्वतंत्रपणे लढायला तयार आहोत. स्वतंत्र लढलो तर किमान ६ जागा येऊ शकतात, असे आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 4 मोठ्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये 1. मविआचे सामाईक उमेदवार म्हणून जालन्यातून मनोज जरांगे पाटील आणि पुण्यातून डॉ. अभिजित वैद्य यांना पाठिंबा द्यावा. 2. 15 ओबीसी उमेदवार असावेत. 3. धार्मिक अल्पसंख्याकांतून किमान 3 उमेदवार लोकसभेसाठी द्यावेत. 4. मविआतील प्रत्येक घटक पक्षाकडून लेखी वचन घ्यावे की, त्यांचा पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय