Saturday, April 20, 2024
Homeजिल्हापुण्यात ‘उत्तररामचरित’ आणि ‘मार्क्स इन सोहो’ या नाटकांचे आयोजन

पुण्यात ‘उत्तररामचरित’ आणि ‘मार्क्स इन सोहो’ या नाटकांचे आयोजन

पुणे : नाटकघर आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे आयोजित व प्रत्यय, कोल्हापूर निर्मित ‘उत्तररामचरित’ आणि ‘मार्क्स इन सोहो’ या नाटकांचे येत्या ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील शुक्रवार पेठ, ज्योत्स्ना भोळे सभागृहात या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.

उत्तररामचरित

साधारण इ. स. पूर्व ५ व्या शतकामध्ये वाल्मिकींनी रचलेलं रामायण हे महाकाव्य, आज दोन हजार वर्षांनंतरही भारतीय सामाजिक-राजकियतेचा एक महत्वाचा घटक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इथल्या धर्म संघटनांनी आणि राजकीय शक्तींनी रामायणातील “आदर्श” प्रतीकांचा चातुर्याने केलेला वापर. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीनं आणि संविधानानं अधोरेखित केलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांची, १९८० च्या दशकापासून गळचेपी सुरु झाली आणि या राजकीय उलथापालथीचं मुख्य प्रतीक बनवलं गेलं “श्रीराम”. या झंझावाताच्या आडून या हस्तकांकडून प्रतिगामी वाट चालूच आहे – “शूद्र” शबुंकांची जागोजाग पिळवणूक आणि भूमिकन्या सीतांवर होणारे अत्याचार वाढतच आहेत. आता काळाबरोबर, अस्थिर मनाच्या या झुंडींचं रूपांतर उग्र तांड्यांमध्ये झालं आहे आणि आपला भवताल बघता बघता एका भयाच्या दरीत ढकलला गेला आहे. पण, महाकाव्यातील त्या प्रतिमांचं पुढं काय झाल? त्यांच्या जाणिवांचं फलित काय शिल्लक राहीलं ? याची कहाणी ‘उत्तररामचरित’ आहे. या नाटकाचे लेखक दिलीप धोंडो कुलकर्णी आहेत तर दिग्दर्शक डॉ. आदित्य खेबूडकर आहेत. हे नाटक शनिवार ८ ऑक्टोबर रोजी सादर केले जाणार आहे.

कार्ल मार्क्सनी मांडलेले विचार तसेच सिद्धांत आपल्याला थोड्याफार प्रमाणात माहीत असतात. परंतु कार्ल मार्क्स नावाचा माणूस कसा होता, त्याचे विचार, लिखाण कसे समृद्ध होत गेले, त्या मागच्या प्रेरणा काय होत्या, त्याचे मैत्री तसेच कौटुंबिक संबंध कसे होते, तो कोणत्या परिस्थितीमध्ये जगला या विषयी आपल्याला माहित नसते. युरोपमधून निर्वासित झाल्यानंतर कार्ल मार्क्सने त्याचे आयुष्य लंडनमधील सोहोमध्ये घालवले. पण नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे तो लंडन ऐवजी न्यूयॉर्कला पोहोचतो आणि हे नाटक घडते.

एका बाजूला मार्क्स आधुनिक जगाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करतो, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील प्रचंड असमानता आणि भांडवलदारांकडून कामगारांची होणारी पिळवणूक यावर भाष्य करतो आणि त्याचवेळी तो एका मागोमाग अशा आठवणींतून स्वतःचे जीवन, पत्नी आणि मुलांवरील प्रेम आणि सहकाऱ्यांसोबतचे असणारे बंध उलगडत जातो. या नाटकातल्या मार्क्सला फार कमी लोक ओळखतात, एक कुटुंबवत्सल माणूस म्हणून, पत्नी आणि मुलांना सांभाळण्यासाठी संघर्ष करणारा, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एका उत्कट ध्येयासाठी अफाट अभ्यास आणि प्रचंड कष्ट करणारा मार्क्स आपल्याला या नाटकात भेटणार आहे.

अमेरीकन इतिहासकार हॉवर्ड झीन यांच्या मार्क्स इन सोहो या इंग्रजी नाटकावर आधारलेल्या या नाटकाचं मराठी रूपांतरण साहिल कल्लोळी यांनी केलं असून ज्येष्ठ अभिनेते तसेच दिग्दर्शक डॉ. शरद भुथाडिया यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. हे नाटक रविवार ९ ऑक्टोबर रोजी सादर होणार आहे आहे.

प्रत्यय, ही गेली चाळीस वर्षे कोल्हापुरात प्रायोगिक नाट्यक्षेत्रात काम करणारी संस्था नाट्यक्षेत्रात वेगळी वाट चोखळणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. नाटक ही एक जबाबदारीने, गांभीर्याने आणि तितक्याच आनंदपूर्ण पद्धतीने सादर करायची कला असून, तिचे मनोरंजन मूल्य देखील तितकेच महत्वाचे आहे. माणूस व समाजाच्या सांस्कृतिक प्रगल्भतेकरता कसदार, आशयघन नाटकांचे सादरीकरण करणे ही प्रत्ययने आपली जबाबदारी मानलेली आहे.

गेल्या चाळीस वर्षात प्रत्ययने जागतिक रंगभूमीवरील अभिजात नाटकांच्या भाषांतरापासून ते भारतीय परंपरेतील आणि मराठी आधुनिक नाटकापासून ते विविध भारतीय भाषांतील नाटके मराठी रंगभूमीवर मंचीत केली आहेत . यामध्ये डॉ. शरद भुथाडिया यांनी दिगदर्शित व अभिनित केलेले राजा लिअर हे नाटक भारतातील अनेक महोत्सवांमध्ये नावाजले गेले. त्याचबरोबर, राशोमोन, क्राइम अँड पनिशमेंट, दुशिंगराव आणि त्याचा माणूस, ऐन वसंतात अर्ध्या रात्री, घोडा, आईन्स्टाईन, कोपनहेगन अशी परदेशी भाषातील भाषांतरीत नाटके, फुटबॉल, चरणदास चोर, कबीर, कर्फ्यू अशी इतर भारतीय भाषांतील भाषांतरित नाटके आणि शेवटचा दिस, वाटा पळवाटा, उध्वस्त धर्मशाळा, सत्यशोधक आणि अनेक इतर, अशी आधुनिक मराठी नाटके प्रत्यय ने रंगमंचावर आणली आहेत.

कोव्हीड काळातील आलेल्या खंडानंतर प्रत्यक्ष संवाद साधण्यासासाठी प्रत्यय, कोल्हापूर दिनांक ८ व ९ ऑक्टोबर २०२२ रोजी, ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे येथे संध्याकाळी ७ वाजता ही दोन नाटके आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे.

अधिक माहिती व तिकीट बुकिंगसाठी
संपर्क : ओंकार – 94201 23091 गुलराज – 95525 72885

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय