कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना तातडीने ऑक्सिजन पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आजच्या कोरोना महामारीत कोल्हापूर मध्ये दिवसेदिवस पेशंटची संख्या वाढत आहे. त्यात कोल्हापूर जिल्हा प्रशासन आपल्या परीने चांगल्या प्रकारे काम करीत आहे. तसेच सामाजिक संस्था, संघटना, नागरीक ही सहकार्य करीत आहे.
पण आज शुक्रवार दिनांक ७ मे २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात ३हजार ते ४ हजार पेशंट ऑक्सिजनचा वापर करीत असल्याचे समजते. या पेशंटांना सुरू असलेला ऑक्सिजन पुरवठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुरेल इतकाच असल्याचे समजते. तरी आपण कोल्हापूर जिल्ह्यासाठी लवकरात लवकर जास्तीत जास्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, अशी मागणी अशोक पवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, प्रवीण पुगावकर, महेश जाधव, राजवर्धन यादव यांनी केली आहे.