Tuesday, April 23, 2024
HomeNewsकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या" मिशन बारामतीला" सुरुवात,आज पुण्यात दाखल !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या” मिशन बारामतीला” सुरुवात,आज पुण्यात दाखल !

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे.त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी (२१ सप्टेंबर) पुण्यात येणार आहेत.

मिशन बारामती मोहिमेला प्रत्यक्ष गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. अमेठी मतदारसंघ जिंकला, आता बारामतीही जिंकणार, असा विश्वास या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाली आहे.

निर्मला सीतारामन यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

तीन दिवसीय दौऱ्यात २१ कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. परिवार सन्मान बैठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, संघटनात्मक तयारी आढावा, मंडल आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका, सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, मोर्चा पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद, भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा, सहकारी आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक, महिला मोर्चा आणि युवक पदाधिकाऱ्यांशी संवाद सीतारामन साधणार आहेत. शासकीय अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी त्या आढावा बैठकही घेणार आहेत.

सीतारामन यांच्या या दौऱ्याच्या तयारीसाठी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. निर्मला सीतारामन यांच्यानंतर केंद्र आणि प्रदेश मधील अनेक वरिष्ठ नेते बारामती दौऱ्यावर येणार आहेत.मिशन लोकसभेसाठी भाजपने १४४ जागा निश्चित केल्या आहेत. त्यातील सोळा जागा राज्यातील असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी काही दिवसांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय