Sunday, July 14, 2024
Homeग्रामीणआदिवासी नृत्याविष्कारात सांदण आदिवासी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

आदिवासी नृत्याविष्कारात सांदण आदिवासी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

भंडारदरा : सांदण आदिवासी लोकचळवळ निर्मित सांदण आदिवासी दिनदर्शिका 2022 चा भव्य प्रकाशन व मोफत वितरण सोहळा पारंपारिक आदिवासी कांबड नृत्य व भोंडाय नृत्याच्या गजरात साम्रद येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रानकवी तुकाराम धांडे प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून उपस्थित होते. पदवीधर तालुका अध्यक्ष सुशीलकुमार चिखले, युवा उद्योजक महेश धिंदळे, सोपान निर्मळ, उत्थित शिल्पकार कविराज बोटे, आदिवासी नृत्यकार सखाराम गांगड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

आशिया खंडातील सर्वज्ञात असलेली सांदन दरी व आजूबाजूला आदिवासी पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारे ए-एम-के व रतनगड पर्वतरांगांच्या पायथ्याला सकाळपासूनच आदिवासी नृत्याचा गजर दुमदुमत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. साम्रद गावच्या भव्य प्रांगणात रमलेल्या या नृत्य सोहळ्यात अनेक देशी- विदेशी पर्यटकांनी सहभाग घेत या आदिवासी नृत्याचा आनंद घेतला. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही सांदण आदिवासी लोकचळवळीच्या सदस्यांसोबत या आदिवासी कांबड नृत्यात सहभाग घेतला.

कांबड मृत्य व भोंडायी नृत्यानंतर आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यास वंदन करून डॉ. किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत गंभीरे व भाऊराव धोंगडे यांनी केले. 

यावेळी उत्थित शिल्पकार, नेपाळ चित्रगॅलरित समावेश असलेले चित्रकार कविराज बोटे यांचा सत्कार करण्यात आला. आदिवासी तरुणांना मार्गदर्शक ठरणारे व उद्योगव्यवसायाकडे घेऊन जाणारे युवा उद्योजक महेश धिंदळे व सोपान निर्मळ यांचाही सत्कार करण्यात आला. 

यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांचा सांदण आदिवासी लोक चळवळीतील कमिटी सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांदण आदिवासी लोक चळवळीचे अध्यक्ष अरविंद सगभोर यांनी केले. यावेळी त्यांनी वैचारिक चळवळीतील दिनदर्शिकेच्या भूमिकेचे महत्व स्पष्ट केले.

वर्षभरात सांदण आदिवासी लोकचळवळीकडून केलेल्या कार्याचा आढावा सचिव किरण बांडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. उद्योगधंद्यांचे महत्त्व महेश धिंदळे यांनी तरुणांना पटवून दिले. आपली माय आणि माती याचं महत्त्व रानकवी तुकाराम धांडे यांनी आपल्या कवितेतून उपस्थितांना पटवून देत असतानाच पुनर्वसन म्हणजे काय? याचाही उलगडा त्यांनी कवितेतून केला. अध्यक्षीय भाषणात डॉ. किरण लहामटे यांनी सांदण आदिवासी लोकचळवळीचे समाज प्रवाहातील वैचारिक प्रबोधनाचे सुरू असलेल्या कार्याचे कौतुक करत असतानाच, पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. बाळु ईदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यानंतर भोजन करत प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली. 

कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष प्रकाश मधे, संजय दिघे, सुनील भवारी, रवी पिचड, अरुण गभाले, सुंदरलाल भोईर, विजय गभाले, विजय कोंडार, संजय ठोकळ, गुरुनाथ म्हशाळ, भाऊसाहेब वेडे, राहुल वायळ, संजय गवळी, प्रकाश डगळे, नामदेव मुठे, शरद जोशी, राजेंद्र साबळे, शोभा साबळे, अर्चना खाडे, मंदा डगळे, इंद्रा घिगे, सुवर्णा ईदे, लता गोंदके व दर्शना भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत साम्रद व ग्राम वन परिस्थितीकीय विकास समिती साम्रद यांनी विशेष सहकार्य केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय