नाशिक : गेल्या दीड वर्षांपासून सामान्य जनता कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहे, कोरोनाच्या महामारीचा उद्योग धंद्यावर मोठा परिणाम झाला असताना महागाई जनतेचा पिच्छा सोडताना दिसत नाही. पेट्रोलने शंभरी पार केलेली असतांना गॅस दराने हजाराच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
कोरोनाच्या संकटाने सामान्यांचे जगणे हैराण झाले असताना महिनाभरात ५० रुपयांनी गॅसची दरवाढ झाली आहे, त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. नाशिकमध्ये गॅसचे दर ८८८.५० रूपये झाले आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी हा दरवाढीचा भार जनतेवर आल्याने जनता त्रस्त झाली आहे.
मोदी सरकारने उज्वला गॅस योजने अंतर्गत महिलांना मोफत गॅस वितरित केले, मात्र आता गॅसने हजारीकडे आगेकूच केले आहे. विशेष म्हणजे १ मार्च २०१४ रोजी गॅसचे दर ४१० रुपये ५० पैसे होते त्यानंतर आतापर्यंत तब्बल ४७८ रुपयांची ही वाढ झाली. अर्थात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर गॅसच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत.