क्वालालंपूर : भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते, देशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली होती त्यानंतर आता पुन्हा काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. असे असताना मलेशिया मध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याने जगाची डोकेदुखी वाढली आहे.
मलेशियात कोरोनाची तिसरी लाट आल्याने तेथे तिसऱ्यांदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी (ता.२) मलेशियात १२६ मृत्यूंची नोंद करण्यात आली. तसेच मलेशियातील वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता १ जूनपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाउनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
मलेशियातील ५ लाख ८७ हजार १६५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे २ हजार ९९३ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात ७ हजार ७०३ नवे रुग्ण आढळून आले. तसेच बुधवारी मृत्यू झालेल्या १२६ पैकी १२३ नागरिक हे मलेशियाचे होते, तर उर्वरीत ३ परदेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे.