Tuesday, January 21, 2025

विशेष लेख : मोदी आणि राहुलच्या पलीकडे पण जग आहे मित्रांनो… – चंद्रकांत झटाले

राजकीय विरोध आणि समर्थन करतांना लोक इतकी टोकाची भूमिका घेताहेत की त्याकरिता आपल्या वर्षानुवर्षे मैत्री असलेल्या अगदी जवळच्या मित्रांशी, नातेवाइकांशीसुद्धा संबंध खराब करून घेताहेत. मतभेद प्रत्येकात असतातच परंतु त्या मतभेदांना त्या विषयांपुरतेच मर्यादित ठेवून वैयक्तिक संबंध जपता आले पाहिजेत. परंतु ह्या राजकीय मतभेदांनी निर्माण झालेल्या टोकांच्या भूमिकांमुळे मोदी आणि राहुलच्या पलीकडे सुद्धा आपलं एक जग आहे, हे मात्र हे लोक विसरतात.

गेल्या काही वर्षातली देशाची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता हा देश दोन भागात विभागला गेलाय. एक म्हणजे मोदी सरकारचे समर्थन करणारे समर्थक तर दुसरे म्हणजे मोदी सरकारला विरोध करणारे विरोधक. मोदी समर्थकांनी तर मोदींना विरोध करणार्‍यांना सरसकट काँग्रेस मध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांना कुणीही विरोध करणारा असो तो काँग्रेसचाच अशी नवीनच व्याख्या ह्यांनी रूढ केली आहे. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणारा सामान्य माणूस सुद्धा असू शकतो हे असे लोक सोयीस्करपणे विसरतात. या देशात जे केंद्रसरकार आहे ते देशातील 33 % मते घेऊन बहुमतात आलेलं आहे. मग ज्यांनी भाजप ला मते दिली नाहीत अशे 77 % मतदार काँग्रेसचेच आहेत काय? ते 77 % मतदार जर काँग्रेसचे आहेत तर तुम्ही 33 % मते घेऊन बहुमतात कसे आलात? 33 % मतांवर तुमचे केंद्रात सरकार कसे काय बनले? देशात भाजप आणि काँग्रेस समर्थक सोडून सामान्य माणूस पण राहतो हे विसरू नका.

विशेष लेख : विशेष लेख : वन निवासींवरील अन्याय थांबवा ! – डॉ. अजित नवले

                     

देशाच्या एकूण मतदारसंख्येच्या 33% मते जरी काँग्रेसकडे असती तरी आज भाजपचे केंद्रात सरकार बसू शकले नसते. भाजपला विरोध करणार्‍यांना सरसकट काँग्रेसी घोषित करून भाजपच्या चुकीच्या धोरणांची पाठराखण होऊ शकत नाही. आज जर सामान्य माणसाला त्रास झाला तर तो बोलणारच. कारण तो कोणत्याही पक्षाचा नाही. त्याच्यासाठी त्याचे बायका-मुलं, कुटुंब, संसार यांपेक्षा कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता महत्वाचा नाही. ह्याच सामान्य माणसाला जेव्हा 450 रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर दुप्पटीपेक्षाही जास्त भावात म्हणजे 950 रुपयांना घ्यावं लागतं, 70 रुपयांना मिळणारे पेट्रोल 115 रुपयांना घ्यावं लागत, 72 रु. ला मिळणारे खाद्यतेल दुपटीने म्हणजे 150 रुपयांना घ्यावं लागत तेव्हा त्याला प्रचंड त्रास होतो. ह्या सर्व गोष्टींचा त्याला रोजच वापर करावा लागतो. ह्या सर्व दुप्पट भाववाढीने त्याचे आर्थिक बजेट कोलमडते. मग तो त्याविरोधात बोलणार नाही? त्याने का निमुटपणे सर्व सहन करावं? त्याने आपल्या समस्या, प्रश्न मांडू नयेत ?

आज देशात बेरोजगारी इतकी भयंकर वाढली आहे की केंद्र सरकारने त्याचे आकडेच देणे बंद केले आहे. कोरोनामुळे आधीच रोजगार बुडालेत, व्यवसाय बुडालेत. अनेकांना आपला नोकर्‍या गमवाव्या लागल्या. नवीन शासकीय भरती होत नाही. इंधनाचे भाव वाढल्याने प्रवास महागला, मालवाहतुकीचे भाव वाढलेत त्यामुळे महागाई आकाशाला भिडली आहे. बँकेतील ठेवींचे व्याजदर कमी झालेत. आधीच कमाई नाही त्यात बँकेतील खात्यात मिनिमम बॅलन्स वर दंड आकारला जातोय. 

हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा

त्यात वृत्तवाहिन्यांना सर्वसामान्यांच्या ह्या सर्व समस्या दिसत नसून 24 तास फक्त हिंदू-मुस्लिम, भारत पाकिस्तान दिसतोय. भारतातली महागाई दिसत नाही पण पाकिस्तानात टमाटर किती महागले हे मात्र स्पष्ट दिसते. प्रसार माध्यमे जणू केंद्र सरकारचे प्रवक्ते बनले आहेत. केंद्राची चुकीची धोरणे कशी चांगली आहेत ह्यातच ते संपूर्ण कौशल्य पणाला लावतात. मग सामान्य माणसांची बाजू घेणार कोण? हा सर्व त्रास सामान्य नागरिकांनी का निमूटपणे सहन करायचा? त्याविरोधात त्यांनी बोलू पण नये. बोललं तर लगेच त्यांना पाकिस्तानी, देशद्रोही म्हणणार? काँग्रेसी म्हणणार?

ह्या सर्व गोष्टींचा जर मला त्रास होतोय म्हणून मी जर बोललो तर माझ्याच बालपणीच्या दोन-तीन मित्रांना हा मोदींच्या किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून त्रास होतो. बरं हा त्रास फक्त महागाई, बेरोजगारी, चुकीच्या धोरणांना विरोध असण्यापुरता मर्यादित राहिला तर ठीक आहे परंतु जणू काही आपली पिढ्यान-पिढ्यांची खानदानी दुश्मनी असल्याप्रमाणे त्यांची आपल्याप्रति असलेली खाजगी आयुष्यातील संपूर्ण वागणूकच बदलून जाते. हे धक्कादायक आहे. असं आयुष्यात आधी कधीही अनुभवलं नाही. आधी सहज कधीतरी सहकुटुंब फिरायला जाणं, घरी महिन्यातून दोन-तीन वेळा येणं-जाणं, मुलांच्या वाढदिवसाला आवर्जून भेटी देणं, मधातच कधीतरी काळजीने सगळं व्यवस्थित आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? अशी विचारपूस करणे, एकमेकांना जीव लावणे हे सर्व फक्त एका नेत्याला विरोध केल्याच्या कारणावरून कसंकाय संपुष्टात येऊ शकतं? हे अनाकलनीय आहे. हे सर्व तर माझे स्वतः चे अनुभव. 

हेही वाचा ! राजकिय भुमिका घेतल्याने “मुलगी झाली हो” मालिकेतून विलास पाटिल यांना काढले?

नागपूरच्या एक चळवळीतल्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या-लेखिका आहेत, त्यांचे सख्खे नातेवाईक जे गेल्या अनेक वर्षांपासून दर दिवाळीला न चुकता घरी फराळ आणून द्यायचे, दसर्‍याला आवर्जून भेटायला यायचे त्यांनी सपशेल संबंध तोडून टाकले. कारण काय तर ह्या लेखिका आपल्या वक्तव्यांतून आणि लिखाणातून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात टीका करतात. किती कमालीची गोष्ट आहे? एका राजकीय व्यक्तीच्या विरोध किंवा समर्थनामुळे आपल्याकडे पाहण्याचा – वागण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातोय. हा फक्त माझा किंवा त्या लेखिकेचाच अनुभव नाही तर असे अनुभव आज देशात लाखो लोक घेताहेत. राजकीय मतांच्या पलीकडे ती व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे? स्वभाव कसा आहे? आपल्याशी वाईट वागते का? आपलं नुकसान केलेलं आहे का? याचा विचारच हे लोक करत नाहीत.

सख्या भावांमध्ये मतभेद असतात. आपल्यात आणि आपल्या आई-वडिलांमध्ये सुद्धा काही विषयांना घेऊन मतभेद असतात. ते असायलाच पाहिजेत. ते जिवंत पणाचे लक्षण आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची प्रत्येकच गोष्ट मान्य असेलच असे कधीच होत नसते. परंतु राजकीय विषयावर मतभेद आहे म्हणून वैयक्तिक संबंध संपुष्टात आणणे हे कितपत योग्य वाटते? त्याने तुमचे पैसे बुडवले नाही, तुम्हाला कधीच फसवले नाही, त्याने किंवा त्याच्या पूर्वजांनी तुमच्या खानदानातील कुणाचाच खून केलेला नाही मग इतकी दुश्मनी कसली? तो फक्त एका नेत्याच्या चुकीच्या धोरणांबद्दल बोलतो कारण त्या नेत्याच्या निर्णयांमुळे ह्याच्या व्यक्तिगत आयुष्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. बस इतका विषय सोडला तर त्याचे आणि तुमचे बहुतांश गोष्टींवरील मतं सारखीच आहेत. मग अडचण कुठे जातेय?

हेही वाचा ! बंपर भरती : ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती

या देशात राजकारण आधीही होतंच. प्रधानमंत्री आधीही होते. आजच्या प्रधानमंत्र्यांपेक्षा प्रचंड लोकप्रिय पंतप्रधान सुद्धा होऊन गेलेत. परंतु त्या प्रधानमंत्र्यांवर सडकून टीका करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा त्या प्रधानमंत्र्यांनी व प्रधानमंत्र्यांच्या समर्थकांनी विरोधकांना दिलेले होते. या देशातील राजकारणात सत्ताधार्‍यांइतकाच विरोधकांचा व त्यांच्या मताचासुद्धा सन्मान होता. केंद्र सरकारच्या विरोधात बोलला म्हणजे तो भाजपचाच, संघाचाच किंवा देशद्रोही, पाकिस्तानी, खलिस्तानी असे कधीच आरोप केले गेले नाहीत. परंतु गेली 50 ते 60 वर्ष विरोधात बसून केंद्र सरकारविरोधात आगपाखड करणारे आज केंद्रात सत्तेत आल्यानंतर 7 वर्षातच विरोधकांना देशद्रोही-पाकिस्तानी म्हणत आहेत. विरोधकांना चुकीचे ठरवतांना नैतिकतेच्या सर्व पातळ्या ओलांडल्या जात आहेत. 

देशात कुण्याही पक्षाशी संबंधित नसलेले सामान्य नागरिकसुद्धा आहेत हे सत्य हे सत्ताधारी मानायलाच तयार नाहीत. हिंदू-मुस्लिम द्वेष तर वाढतोच आहे परंतु आता तर एकाच धर्माच्या, एकाच जातीच्या लोकांमध्येसुद्धा राजकीय विचारांमुळे वैर वाढत आहे. हे असं या देशात पहिल्यांदाच होतंय. विरोधी पक्ष आपले प्रश्न प्रभावीपणे मांडत नाही आणि सरकारसमोर आपले प्रश्न मांडले की सरकार सामान्यांना देशद्रोही, काँग्रेसी घोषीत करुन मोकळी होते मग आमचे प्रश्न सोडविणार कोण? देशातील कॉमन मॅन या सर्व गोष्टींना वैतागलाय.

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

हीच गोष्ट काँग्रेस आणि राहुल समर्थकांना सुद्धा लागू पडते की, केंद्राला समर्थन करणार्‍यांना वैयक्तिक शत्रू म्हणून पाहू नये. ते खरे की आपण खरे हे येणारा काळ दोघांनाही सांगेलच. काही लोकांना लवकर कळते काहींना थोडा वेळ लागतो परंतु सत्य लपत नसते. परंतु ते सत्य समजेपर्यंत आपले वैयक्तिक संबंध संपुष्टात येऊ नयेत. ते आपण जपले पाहिजेत. राजकारणासाठी आपले वैयक्तिक संबंध खराब होणार नाहीत याची प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे. उद्या मोदी किंवा राहुल सत्तेत असतील-नसतील पण आपण तर जिथे आहोत तिथे सोबतच राहणार आहोत.

                         

शेवटी जेव्हा आपल्याला अडचणी येतील, आपल्या आयुष्यात समस्या निर्माण होतील तेव्हा ना कोणी मोदी सोडवायला येणार आहे ना राहुल गांधी. काम पडलं की आपण एकमेकांनाच हाक मारणार आहोत. आपल्यालाच परस्परांच्या मदतीसाठी धावून जायचं आहे. तेव्हा फक्त एका राजकीय विषयावर आपले विचार वेगळे असले तरी आपली वैयक्तिक मैत्री-नाते संबंध जपा. परस्परांशी शत्रुंसारखे वागु नका. कारण मोदी आणि राहुलच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो.

– चंद्रकांत झटाले, अकोला


Related Articles

- Advertisement -

Latest Articles