Saturday, April 20, 2024
Homeराजकारणशिंदे - भाजप सरकारमध्ये एकाही महिलेला संधी नाही, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…

शिंदे – भाजप सरकारमध्ये एकाही महिलेला संधी नाही, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर जवळपास ४० दिवसांनंतर शिंदे भाजपने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. आज शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ असे एकूण १८ जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळात एकही महिला नसल्याने विरोधकांकडून शिंदे – भाजप सरकारवर टिका केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे कि, राज्यातील अनेक नेते जे कधी काळी आमच्यासोबत होते त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र आज झालेल्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली आहे. देशात पन्नास टक्के लोकसंख्या महिलांची आहे, मात्र आजच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान न देणे हे धक्कादायक आहे, असे त्या म्हणाल्या.

सत्ताधारी पक्षातील नेत्यांची वक्तव्ये अनेकदा महिलांचा मानसन्मान करणारी नसतात. महिलांनी स्वयंपाकघरात जावे, स्वयंपाक करावा असे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसते, असे ताशेरे सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर ओढले. या मंत्रिमंडळात आमच्यासोबत असलेले अनेक चेहरे दिसत आहेत. आम्ही एकत्रित राज्याची कामेही केली आहेत. अशा लोकांना मंत्रिपदाची संधी मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्षे भाजपमध्ये सतरंजी उचलण्यापासून अनेक कामे अनेकांनी केली पण त्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत, याउलट आमच्या मधील हुशार लोकांना ही संधी मिळाली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवरून राजकारण सुरु झाले आहे. याबाबतही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांची मंत्रिपदावरून हाकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली होती. आज संजय राठोड यांना क्लीनचीट मिळाली असे सांगत सत्ताधारी भाजपनेच त्यांना मंत्री केले आहे. त्यामुळे भाजपने संजय राठोड आणि समस्त बंजारा समाजाची माफी मागावी, अशी मागणी सुळे यांनी केली. तसेच पुजा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू, असे त्या म्हणाल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय