मुंबई, दि. २३ : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या ७ तारखेला होतो. मात्र तो अद्याप मिळालेला नाही. सोमवारी एसटी महामंडळाचा याबाबतीत सावळा गोंधळ पाहायला मिळाला. रायगड जिल्ह्यातील पेण आणि कर्जत आगारातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पेसे जमा झाले. मात्र नंतर काढून घेतला गेला.
लेखापाल विभागाकडून चुकून रायगड येथील कर्मचाऱ्यांच्या खात्यात, सोमवारी पैसे जमा करण्यात आले होते. मात्र मुंबई आणि इतर ठिकाणी पगार न मिळाल्याने गोंधळाचे वातावरण होते. मात्र काही वेळाने रायगडच्या कर्मचाऱ्यांना खात्यातुन पैसे काढू नका ते परत द्यायचे आहेत असे सांगण्यात आले.
एसटीच्या रायगड विभागीय कार्यालयांमध्ये डिझेल करिता ठेवलेले दीड कोटी रुपये शेकडो कर्मचाऱ्यांच्या पगाराकरीता वापरल्याची धक्कादायक घटना रामवाडी, पेण येथील विभागीय कार्यालयातून घडली. मात्र चूक लक्षात येताच काही कालावधीत ही रक्कम परत घेण्यात आली.
एसटीचे रायगड विभागीय कार्यालय पेण येथे असून या कार्यालयातील अकाउंट डिपार्टमेंटने एसटीला रोज लागणाऱ्या डिझेल करिता ठेवलेले सुमारे दीड कोटी रुपये डिझेलसाठी न वापरता शेकडो कामगारांच्या पगारासाठी वापरण्यात आले.
मात्र काही वेळातच लेखा शाखेतील अधिकाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट येताच ऑनलाईन केलेले पगार परत घेण्यासाठी अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. लेखा शाखेतील अधिकारी, स्वतः विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी संबंधित बँकांशी संपर्क साधून सदरची रक्कम परत मागवून घेतली.
डिझेल अभावी एस. टी. बंद होण्याचा धोका टळला
डिझेल अभावी एस. टी. बंद होण्याचा धोका टळला खरा, परंतु अधिकाऱ्यांची बेपर्वाई समोर आली आहे. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी म्हटले आहे.