Friday, April 19, 2024
Homeक्राईमचक्क गरम तव्यावर बसून शिव्या देणारा तथाकथित 'बाबा'! गुन्हे शाखेचे पथक आश्रमात...

चक्क गरम तव्यावर बसून शिव्या देणारा तथाकथित ‘बाबा’! गुन्हे शाखेचे पथक आश्रमात धडकले

अमरावती : एक बाबा चक्क चुलीवर ठेवण्यात आलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देतो. आशीर्वाद काय अस्सल वऱ्हाडी भाषेत अतिशय घाणेरड्या शिव्यांची लाखोली वाहतो. एक भक्त चुलीखाली पेटलेली लाकडं टाकण्यात मग्न तर काही जण ‘त्या’ बाबाच्या शिव्यांना प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

आपल्या खास अंदाजात पांढरं धोतर खांद्यावर पांढरा दुपट्टा ओढून विडी ओढणाऱ्या या बाबाचा ३० सेकंदाचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. मात्र तो कुठला, याचा सुगावा नेटकऱ्यांना लागत नव्हता. अखेर बाबा सापडला. तिवसा तालुक्यातील मार्डी कारला मार्गावर त्याने तथाकथित आश्रम थाटले आहे. सच्चिदानंद गुरुदास बाबा, असे त्याचे नाव.

वेगवेगळ्या ग्रुपवर नेटकऱ्यांनी तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल केला. शिवरात्रीपासून या बाबाची चर्चा सुरू होती. लग्न सोहळ्यात किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात पोळ्या करण्यासाठी पेटविण्यात आलेल्या चुलीवरील तव्यावर बसलेला हा बाबा ‘चूल पेटवा मला झोपायचे आहे’ असा संवाद उपस्थितांशी साधताना दिसतो. मधातच भक्त लोटांगण घालतात तर चप्पल घालून जवळ आलेल्या भक्ताला शिवीगाळ करून बाबा हाकलून लावतात. त्यामुळे हा तंदुरी बाबा कोण, याची अनेकांना उत्सुकता होती. व्हिडीओची दखल अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने घेतली असून शनिवारी पोलिसांचे पथक या बाबाच्या आश्रमात धडकले. झपाट्याने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे अंधश्रद्धा पसरण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी स्वत: पुढाकार घेत बाबाची चौकशी सुरू केली आहे. सच्चिदानंद गुरुदास बाबाने केलेले दावे किती खरे, हेही पडताळून पाहिले जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख तपन कोल्हे यांनी लोकमतला सांगितले. आश्रमात पथक पोहोचले तेव्हा बाबा बाहेर गावी गेले असल्याचे सांगण्यात आले.

आम्ही गरम केलेल्या तव्यावर बसून दाखवा-अंनिसचे आव्हान

१०८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्णता माणूस सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही पेटविलेल्या चुलीच्या तव्यावर बाबाने बसून दाखवावे. यात त्यांना कोणतीही इजा होता कामा नये. झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी या बाबाची राहील, असे खुले आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय