पिंपरी चिंचवड : नॉन कोव्हीड आजारी रुग्णांनी कुठे जायचे,असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव गणेश दराडे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, मनपाचे वायसीएम रुग्णालय संपूर्णपणे कोव्हीड साठी समर्पित करण्याचा आदेश आयुक्त यांनी पारित केला आहे. त्यामुळे रुग्णालयातील कोरोना व्यतिरिक्त अन्य सर्व आजारांच्या तातडीच्या ओपीडी, आयपीडी तसेच तत्सम रुग्णसेवा बंद करण्यात आल्या आहेत. एकूण ७५० बेड असलेल्या सहा मजली या मोठया रुग्णालयात अन्य सर्व आजारांसाठी आता शहरातील हजारो रुग्णांनी ससूनमध्ये जावे किंवा खाजगी महागड्या रुग्णालयात जावे, हा एक मात्र पर्याय आहे.
अस्थमा, उच्च रक्तदाब, अक्सिडेंट, मधुमेही इ. आजारासाठी उपचार आता या रुग्णालयात होणार नाहीत. ससून रुग्णालयाचे काही मजले कोव्हीड समर्पित असले तरी तेथे नॉन कोव्हीड विभाग देखील सुरू आहे, मात्र तेथे प्रचंड गर्दी आहे.
पिंपरी चिंचवड मधील नॉन कोव्हीड रुग्णांना तेथे जाणे किती अवघड व जिकीरीचे आहे, याचा विचार आरोग्य विभागाने केला आहे काय, असा सवालही माकपने केला आहे.
वायसीएम चे दोन मजले म्हणजे 240 बेड्स नॉन कोव्हीड रुग्णासाठी राखीव ठेवावेत, अशी मागणी माकपने केली आहे.
कोव्हीड रुग्णाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन खाजगी शिक्षण संस्था, मंगल कार्यालये, धूळ खात पडून असलेल्या मनपाच्या शहरातील अनेक इमारती ताब्यात घ्याव्यात. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि त्यावर काम करणारे अधिकारी यांनी त्या ठिकाणी कोव्हीड रुग्णालये सुरू करावीत.
आटो क्लस्टर व जंबो अण्णासाहेब मगर 800 बेड्स व रुबी एल केयरकरीता नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक न करता पुर्ण क्षमतेने सुरू करावीत व त्यांच्या देखरेखीसाठी उपायुक्त/ सहाय्यक आयुक्त दर्जाची दैनंदिन देखरेखीकरीता सक्षम अधिकारी आणि टीम नेमावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वायसीएम कोव्हीड समर्पित झाल्यामुळे नॉन कोव्हीड रुग्ण वाऱ्यावर सोडू नयेत. आपत्कालीन काळामध्ये अंदाज पत्रकातील अन्य आर्थिक तरतुदी कोव्हीड आणि नॉन कोव्हीड रुग्णासाठी वापरता येतात. तरी महानगरपालिकेने नागरिकांचे आजारातून जीव वाचविण्यासाठी गंभीरतेने दखल घ्यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पिंपरी चिंचवड शहर समितीचे गणेश दराडे, अशोक वाघिकर, सुकुमार पोन्नपन, ख्वाजा जमखाने, सतीश नायर, क्रांतिकुमार कडुलकर, शेहनाज शेख, निर्मला येवले, किसन शेवते, अविनाश लाटकर, रिया सागवेकर यांनी केली आहे.