Saturday, December 7, 2024
Homeग्रामीणघराला नव्हता दरवाजा, अत्याचाराने चिमुकलीने जीवही गमावला

घराला नव्हता दरवाजा, अत्याचाराने चिमुकलीने जीवही गमावला

आदिवासी परिवाराच्या सांत्वनसाठी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते‌ भेटीला

रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण  शहरालाच लागून असलेल्या आदिवासी वाडीवरील संतापजनक घटनेने रायगड जिल्हा हादरून गेला. जड अंत:करणाने अखिल भारतीय किसान सभा, जनवादी माहिला संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यासह अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी परिवाराच्या सांत्वनसाठी भेट घेतली.

दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी आई – वडिलांच्या कुशीत झोपलेल्या  अडीच वर्षांच्या चिमुकलीला वासनांध नराधमाने उचलून नेले तिच्यावर अत्याचार करुन तिची दुर्दैवी हत्या केली. आपल्या कुशीत झोपलेली चिमुकली न दिसल्याने तिची आई कासाविस झाली. तिच्या वडिलांना देखिल उठवले, भल्या पहाटे शोध सुरू झाला. ३०/३५ घरे असलेली आदिवासी वाडी जागी झाली शोधाशोध सुरू झाली. पण ती चिमुकली वाडीत सापडली नाही. मात्र काही वेळाने तिचा मृतदेह वाडी परिसरात टाकून हा नराधम फरार झाला. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ती चिमुकली हे जग सोडून गेली असे डॉक्टरांनी सांगितले आणि त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. दुसऱ्या दिवशी पेण शहरांने कडकडीत बंद पाळला, प्रचंड मोठा मोर्चा काढला, आपला संताप व्यक्त केला. फास्ट ट्रॅकवर खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा करा, फाशी द्या, अशी मागणी विविध संंघटनांनी केली आहे.

कुटुंबाची भेट घेण्यासाठी पालक मंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही भेट घेतली.

    

आदिवासी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे ? देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतर ही शोषीत समाजाच्या प्रगतीसाठी सर्व स्तरावर असलेली उदासिनता पहायला मिळाली. घर आहे पण त्याचा सडलेला दरवाजा तुटल्यानंतर  हातावर पोट असलेल्या या कुटुंबाला नव्याने दरवाजा सुध्दा लावता आली नाही. परिणामी या घरात आदेश पाटील ‌नावाच्या नराधमाला प्रवेश सुलभ झाला आणि चिमुकलीवर अत्याचार ह़ोऊन जीव गमवावा लागला.

  

३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता संपुर्ण माहिती पणजीने चिमुकलीच्या प्रतिमेजवळ बसून कथन केली. तिची एकच मागणी होती हा खटला तातडीने चालवावा व आरोप सिद्ध होताच त्याला फाशी द्या. होय कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. आरोपिला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

   

घरात नजर फिरवली तर दररोजच्या जगण्यासाठीच्या चीज वस्तूंची वानवा दिसली. रेशनवर आंत्योदय योजनेचे धान्य आले आहे ते घेण्यासाठी निरोप मिळाला. आम्ही इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अल्पशी मदत केली आणि जड अंतःकरणाने आदिवासी वाडीतून बाहेर पडलो, अशी माहिती संघटनांच्या प्रतिनिधीने दिली.

यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील, जिल्हा अध्यक्षा  ज्योती म्हात्रे, डीवायएफआयचे राज्य कोषाध्यक्ष संतोष ठाकूर, बुक्टुचे प्राध्यापक शिकारे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड संजय ठाकूर यांच्यासह ताराबाई ठाकूर, नयना म्हात्रे, सुनंदा वाघमारे, बेबीताई कातकरी, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्त कमिटीचे किरण केणी, ज्योत्स्ना केणी, ललीता भोईर, चांगुणा डाकी, कविता मुंडकर व निशांत भोपी आदीसह उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय