नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादीची प्रतिक्रिया आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, देशात एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा राहण्यासाठी काही निकष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली बाजू योग्यरीत्या मांडली होती. राष्ट्रीय पक्ष निकषांमध्ये प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतो. आगामी काळात इतर राज्यांच्या निवडणुकीत आमच्या पक्षाची कामगिरी समाधानकारक होऊन पक्षाला राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दर्जा काढण्याचा निर्णय काही राजकीय पक्षांबद्दल घेतला आहे. या निर्णयाबद्दल मतमतांतरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केंद्रीय पक्ष समिती याबाबत योग्य विचारविनिमय करेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रापुरते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल अशी चिन्हं नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीबाबत आम्हाला चिंता नाही. अन्य राज्यातील निवडणुका झाल्यावर समाधानकारक कामगिरीनुसार पक्षाला राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.