Wednesday, April 24, 2024
HomeNewsयंत्र हातातच हवे, डोकीत नको; डॉ. तारा भवाळकर यांचे मत

यंत्र हातातच हवे, डोकीत नको; डॉ. तारा भवाळकर यांचे मत

यंत्र युगामुळे माणूस यंत्रशरण जात आहे. यंत्र आपल्या हातातच हवे, डोकीत जाता कामा नये. जर यंत्राने मानवावर अतिक्रमण केले तर मानव मानवच उरणार नाही, असे मत लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात अण्णा भाऊ साठे नगरीत भरलेल्या सतराव्या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. भवाळकर बोलत होत्या. या संमेलनाचे उद्घाटन विश्‍वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष राज्याचे कामगार व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे स्वागताध्यक्ष होते, तर यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, नाटककार प्रेमानंद गज्वी, प्रधान सचिव विनीता वेद सिंगल, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, परंपरेतील श्रमसंस्कृतीचा आढावा घेत असताना पारंपारिक ओव्यांची जोड देत महिलांना यंत्रयुगामुळेच श्रममुक्ती मिळाल्याचे सांगितले. कामगार चळवळीतून आलेल्या कामगार साहित्यिकांनी कामगारांना हक्काची जाणीव करून देत असताना प्रतिष्ठा, स्वाभिमानाचीही जाणीव करून दिली. यातूनच आजची महानगरे ही यंत्रयुगाचीच देण बनली आहेत.

यंत्रामुळे कितीही प्रगती साधली तरी यंत्र बनविणारे हात हे मानवीच असून सजृनता यामध्ये आहे. यंत्रआहारी गेला तर मानव आपली श्रमसंस्कृती विसरण्याचा धोका आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेच्या जोरावर सुखसुविधा उपलब्ध होउ शकतात. मात्र, जगण्यातील कलात्मकता ही केवळ सृजनातूनच मिळू शकते. यामुळे माणूस म्हणून टिकून राहण्यासाठी कलात्मकताही जोपासण्याची गरज आहे. भाकरी जशी जगण्यासाठी आवश्यक आहे तसेच सौंदर्य हे कसे जगायचे हेच शिकवते.



यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना डॉ. दीक्षित म्हणाले, बुध्दी आणि श्रम हे एकत्र नांदत असतील तरच माणूस घडत असतो. श्रमातून सौंदर्य आणि संपत्ती निर्माण होते. साठोत्तर काळातच कामगार चळवळीतून जन्माला आलेल्या साहित्यातून साहित्याचे दलित, कामगार साहित्य निर्माण झाले. आज चळवळी मंदावल्याचे चित्र दिसत आहे. जागतिकीकरणाचे दुष्परिणाम या चळवळीवर झाले असून यातून कंत्राटी कामगार पध्दती रूढ होउ लागली आहे. साहित्यातील संवेदनशिलताच यामध्ये स्थैर्य निर्माण करू शकते.

यावेळी स्वागताध्यक्ष या नात्याने बोलताना पालकमंत्री खाडे यांनी संमेलन आयोजनामागील हेतू विषद केला तर, कल्याण आयुक्त इळवे यांनी प्रास्ताविक केले. संमेलनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यामध्ये शाळकरी मुलांसह शहरातील डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. दयानंद नाईक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. भीमराव धुळूबुळे, डॉ. विकास पाटील आदी सहभागी झाले होते. दोन दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये विविध चर्चासत्रे, कवि संमेलने यांचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनाला बारामती येथील विविध कामगार संघटनांनी हजेरी लावली त्यामध्ये राजू सस्ते, शिवाजी खामगळ, सुरेश दरेकर ,रमेश लोखंडे ,संजय कचरे, संजय दुर्गुडे तसेच कामगार बंधू आणि कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय