Saturday, December 7, 2024
Homeविशेष लेखजागतिक पर्यावरण दिन 2021 ची संकल्पना इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration)

जागतिक पर्यावरण दिन 2021 ची संकल्पना इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration)

5 जून हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्राने स्टॉकहोम येथे ‘United Nations Conference on Human Environment’ (UNCHE) ही परिषद भरवली होती. या परिषदेत पहिल्यांदाच पर्यावरण हा विकासाचा एक निर्णायक मुद्दा असल्याचे मानण्यात आले. आणि मग त्यानंतर 1974 पासून दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. पर्यावरण संवर्धनाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी आज जगभरात अनेक प्रयत्न सुरू आहेत.

आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचा आपण अगदी हक्कानं मनसोक्त उपभोग घेत असतो. पण या हक्कांच्या सोबतीनं निसर्गाप्रति आपली काही कर्तव्ये सुद्धा असतात हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरतो. भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूलभूत कर्तव्यांची यादी  दिलेली आहे, त्यामध्ये एक कर्तव्य हे पर्यावरणाशी संबंधित आहे. त्यानुसार – “वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.” 

परंतु आपण आपली कर्तव्य विसरुन गेलो आहोत. आपण फक्त अति हव्यासपणे उपभोग घेत आहे. जंगले, डोंगर नेस्तनाबूत करत विकासाचे डोलारे उभे करत आहोत. विनाशाकडे जाणाऱ्या पायऱ्या आपण बेधुंद होऊन चढत आहोत. मुठभरांच्या विकासाचा बहुसंख्य जनतेला त्रास सहन करावा लआगत आहे. शहरे हीच विकासाची केंद्रबिंदू मानून, सुखसोयी, विलासी जीवन माणून मशगुल आहोत. परंतु हा विकास मानवी जीवन कमी करणारा ठरत आहे. याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, हे पुन्हा लक्षात घेण्याची गरज आहे.

2021 वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं. वर्षानुवर्षं आपण आपल्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत, आणि परिणामी पर्यावरणाचं नुकसान झालंय. ते भरुन काढण्यासाठी शाश्वत लोककेंद्री विकासाची आग्रही मागणी गरजेची आहे.

गेल्या चार वर्षांपासून निसर्ग समजून घेण्याचा, त्याविषयी आणि त्याच्या ऱ्हास विषयी मांडण्याचे काम करत आहे. परंतु पर्यावरण दिन लेख लिहून, पोस्ट करुन काही होणार नाही. परंतु काही लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाणे गरजेचे आहे. परंतु कधी कधी स्वतःची लाज वाटते ! कारण आपला देश पर्यावरणावर काम करण्यात इतका कमी पडत आहे. आणि अजून त्याकडे लक्ष दिले जात नाही. वन विभाग आणि कृषी विभाग यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकते. परंतु आता प्रत्येक ठिक हे नोकरीपुरते सिमीत झाले आहे. त्याकडे आपलेपणाने, आपुलकी, माझे कर्तव्य म्हणून पहाणे माणसाने सोडून दिले आहे. पैसा हेच मानवाचे सुख बनले, सुशिक्षितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

समोर विनाश दिसत असताना माणूस समजत नसेल तर यापेक्षा वाईट बाब जगात कुठलीच असणार नाही। पृथ्वीचा विनाश आपणच करत आहोत. परंतु दुसऱ्या ग्रहावर जाऊन त्याचा पण विनाश करण्याचा आपण विचार करत आहोत. हे विज्ञानाचा आव आणून करत असाल तर हे विनाशकारी आहे. आपण स्वतःचे मरण जवळ आणतोय.

आज जाणीवपूर्वक पर्यावरणीय संकल्पना, आकडेवारी, धोरणं, कायदे याबद्दल लिहिण्याचं टाळत आहे. कारण आपण याचा आजपर्यंत विचारच केला नाही. आपण लॉकडाऊनचेच नियम पाळत नाही, तर इतर कधी पाळणार ? सगळे सोयीनुसार सुरु आहे. कायदे सोयीनुसार वापरले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे ही निसर्ग विरोधी आहे. बड्या भांडवलदारांना नफा मिळवून देणारी आणि बहुसंख्य जनतेचे शोषण करणारी आहेत. फक्त नफ्यासाठी आणि संपत्तीसाठि चाललेली चढाओढ विनाशाच्या वाटेवर घेऊन जाणारी आहे, हे भान विसरलेली डोकी दिसत असते. 

पश्चिम घाट हा जगातील वारसा आहे. तो पण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते दुर्भाग्य आहे. जोपर्यंत तुझं आणि माझं करणारे लोक आहेत. तोपर्यंत हा ऱ्हास चालूच राहिली. मृत्यू च्या उंबरठ्यावर असलेला माणूस नावाचा प्राणी बुध्दीच्या जोरावर स्वतः विनाश करत आहे. जोपर्यंत ही सृष्टी, जैवविविधता, नद्या, डोंगर, पर्वत, जंगले हे माझे आहे, हे मानून काम करत नाही. तोपर्यंत हा विनाश थांबणार नाही. पर्यावरणवादी, पर्यावरण प्रेमी अखंड मानवजातीसाठी लढत राहतील. तुम्हाला पण जात, धर्म, पंथ या भिंती ओलांडून मानवजातीला एकत्र यावे लागेल.

नवनाथ मोरे 

मु. खटकाळे, ता. जुन्नर (पुणे )

9322424278


संबंधित लेख

लोकप्रिय