पिंपरी चिंचवड : भाजपच्याच काही नगरसेवकांनी आपल्याच नेत्यांचे व महापालिकेतील भ्रष्टाचाराचे केलेले वस्त्रहरण, ठेकेदारी व टक्केवारीसाठी दोन आमदार व त्यांच्या बगलबच्च्यांमध्ये होत असलेली लूटमार, इतिहासात पहिल्यांदाच लाच प्रकरणी भाजपच्या पदाधिका-यांना झालेली अटक, आदींमुळे अब्रूचे खोबरे झालेल्या सत्ताधा-यांनी आयुक्तांवर केलेले आरोप हास्यास्पद असून जनतेचे लक्ष या घटनांवरून वेधण्यासाठी रचलेले हे षड्यंत्र आहे.
पिंपरी चिचंवड महानगरपालिकेच्या महापौर सौ.माई ढोरे यांनी काही पदाधिका-यां समवेत नुकतीच पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यपध्दतीवर टिका करत ‘आयुक्त विकास कामांना अडथळा निर्माण करतात ‘असे आरोप केले.
वास्तविक पाहता महापौरांचे व शहरातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आयुक्तांवरील रोषाचे कारण काही वेगळेच आहे पण आत्ता ते वेगळेच कारण पुढे करत आयुक्तांना लक्ष करत आहेत .मात्र दर्शविलेल्या निमित्त कारणांसाठी रोष व्यक्त करण्याची वेळ चुकल्याने महापौरांच्या टिकेमागील वेगळे कारण उघड होत आहे.
शहरातील जनता सुज्ञ आहे .या जनतेने आजवर भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेल्या कार्यकाळात मागील साडेचार वर्षांपासून झालेला भ्रष्टाचार पाहिला आहे, शास्ती कराच्या नावाने दिलेली खोटी आश्वासने पाहिली आहेत, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेली ‘डार्क लूट ‘अनुभवली आहे, कोरोना विषाणूंच्या काळात केलेले चुकीचे नियोजन त्यात झालेली प्राणहानी व त्यात सुध्दा केलेला भ्रष्टाचार ही जनते पाहिला आहे, कृत्रिम पाणी टंचाई व टॅंकर राज ही साखळी,शिक्षण मंडळातील बेधुंद व चुकीची खरेदी,एफ डी आर घोटाळा, लाचलुचपत विभागाची धाड व रंगेहात पकडलेले पदाधिकारी, पर्यावरणाचे प्रश्न, नद्यांची स्वच्छता, आरोग्यसुविधा, काँक्रिट रोड मधील मधील भ्रष्टाचार, निगडीत मृतदेहाची झालेली विटंबना, यासह इतरही अनेक अनियोजित घटना व बाबींच्या संदर्भात ‘महापौर का बोलत नाही ‘? हा जनतेचा सवाल मी काँग्रेस कडून महापौरांना जाहीरपणे विचारत आहे का यासही पण इतर कोणी जबाबदार आहे ? याचे उत्तर महापौरांनी द्यावे.
केवळ गरीबांना तीन हजार रूपये थेट मदत न देणे व ड्रायविंग स्कूल प्रशिक्षणाबाबत आपण आयुक्तांना जबाबदार धरत असाल तर बाकी बाबतीत स्व जबाबदारी चे काय? आपण पूर्व तयारी व पूर्व नियोजन असल्याशिवाय घोषणा कशी केलीत? असा सवाल कदम यांनी केला आहे.
तरी महापौरांनी मनपा कामकाजाचे आत्मपरीक्षण करावे व अपयश मान्य करून पदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन कदम यांनी केले आहे.
– क्रांतिकुमार कडुलकर