आज ५ सप्टेंबर रोजी भारतीय शिक्षक दिन साजरा होत आहे.अर्थात गेल्या काही वर्षात क्रांतीबा महात्मा फुले यांचा जन्मदिनही शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. फुले दाम्पत्याचे शैक्षणीक क्षेत्रातील काम अतुलनीय आहे यात शंकाच नाही. मात्र गेली अनेक वर्षे शासकीय पातळीवर आजचा दिवसच ‘शिक्षक दिन’ म्हणूनच साजरा केला जातो. शिवाय शिक्षण क्षेत्रापुढील आजची आव्हाने दिवस बदलापेक्षा कैक पटीने मोठी व भयावह आहेत असे मला वाटते. म्हणूनच सर्वप्रथम आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षक बंधू भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. आज या दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणाऱ्या आणि यापूर्वी याच दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या तमाम मंडळींचे मनःपूर्वक अभिनंदन.
खरेतर ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे या बाबी माणसाच्या जन्मापासूनच घडत असतात. ज्ञानप्राप्ती ही कधीच पूर्ण होत नसते.कारण ज्ञानाचा विस्तार व कक्षा इतक्या रुंद असतात कि, ते सर्व आत्मसात करणे अशक्य असते. म्हणूनच एका विषयातील ‘तज्ञ’ एखाद्या विषयाबाबत ‘अज्ञ’ असू शकतो म्हणूनच ‘सर्वज्ञ’ कोणीच नसते. त्यामुळे शिकवणारे आणि शिकणारे हे नेहमीच एका अर्थाने विद्यार्थी असतात. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने भोवतालची परिस्थिती लक्षात घेतली तर काही गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या दिसतात. या दिवसाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी नव्या शैक्षणिक धोरणाची होळीही करण्यात येत आहे.
एकीकडे कोव्हिडं -१९ विषाणूमुळे सहा महिने देशातील सर्व शैक्षणिक ज्ञानकेंद्रे बंद आहेत. कोरोनामुळे शालेय पासून पदवी -पदव्युत्तर परीक्षांचे प्रश्न जटिल होत आहेत. याच काळात ‘नवे शैक्षणिक धोरण ‘ विद्यमान केंद्र सरकारने सभागृहात चर्चाही न करता मंजूर केले आहे.त्याला अनेक राज्यांनी व शिक्षण तज्ञांनी विरोध केला आहे. त्यामुळे यावर्षीचा शिक्षकदिन शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था, शिक्षण व्यवस्था आणि शैक्षणिक धोरण या सगळ्याचा व सगळ्यांनी एकत्रित विचार करून साजरा करण्याची गरज आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने हेही लक्षात घेण्याची गरज आहे की, गेल्या काही वर्षात सर्वत्रच शिकवणारे आणि शिकणारे यांच्यात कुठेतरी अंतर पडत चालले आहे. सदोष शिक्षण पद्धती हे त्याचे मुख्य कारण आहे. शिकवायचे ते नेमून दिलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि शिकायचे ते पदवीच्या भेंडोळ्यात सार्थकता मानण्यासाठी एवढी उथळ वृत्ती सर्रास दिसत आहे. दररोज नवनव्या ज्ञानशाखांचा उदय जागतिक पातळीवर होत असताना आम्ही मात्र मागासलेपणात धन्यता मानणार काय? असा प्रश्न उभा राहतो. कोरोना काळात शिक्षण व्यवस्था सुरळीत सुरू व्हावी याकरिता सत्ताधारी पक्ष गांभीर्याने काही करताना दिसत नाही. मात्र मंदिरे सुरू राहावी यासाठी घंटानाद सुरू आहे. आणि याला फुले- शाहू – आंबेडकर यांचे विचारांचे वाहक म्हणवून घेणारेही साथ देत तशीच मागणी करत आहेत. हे आमचा अग्रक्रम कशाला? याचे द्योतक आहे. ज्ञानमंदिरे बंद राहिली तरी चालतील पण सर्वत्र व्यापून आहे असे म्हटले जाणाऱ्या देवतांची मंदिरे खुली व्हावीत अशी घंटानादी मागणी करणे ही विचारपद्धतीच शिक्षणव्यवस्थे पुढील मोठे आव्हान आहे. शिक्षक वर्गाने आणि शिक्षक संघटनांनी याचा अग्रक्रमाने विचार करण्याची गरज आहे. आपला देश काळाबरोबर किंवा काळाच्या पुढे जाण्यासाठी जसे समर्थ शिक्षक लागतात तसेच समर्थ विद्यार्थीहीअसावे लागतात. किंबहूना समर्थ विद्यार्थी असले तरच समर्थ शिक्षक बनतात. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपल्याजवळील ज्ञान प्रामाणिकपणे दुसऱ्याला देणे आणि दुसर्याने दिलेले ज्ञान प्रामाणिकपणे स्वतः आत्मसात करणे हे सूत्र शिक्षक दिनाचा संदेश म्हणून स्वीकारले पाहिजे.
या शिक्षकदिनी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, शिक्षण आणि समाजपरिवर्तन यांचा परस्पर संबंध फार जवळचा आहे. सर्वांना समान शिक्षण मिळाल्याशिवाय समाज परिवर्तन होणार नाही. भारतरत्न डॉ.आंबेडकरांनी म्हटले होते, “नुसती डोकी मोजून उपयोग नसतो तर डोक्यात काय चालले आहे हे तपासणे महत्त्वाचे असते. “मुळात आपल्या या महान खंडप्राय आणि हजार वर्षाचा इतिहास असणाऱ्या देशात सर्वसामान्य माणसांना शिक्षणाची दारे किलकिली व्हायला लागली ती गेल्या शंभर वर्षातच. आज सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला तरीही ही निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे हे वास्तव आहे. ‘शिकेल तो टिकेल’ हा सुविचार वाचायला – ऐकायला बरा वाटत असला तरी, ज्याला शिकायची संधीच नाही त्यांना टिकायचं कसं ? याचा साकल्याने विचार झाला नाही. त्याच उत्तर शोधण्याच्या प्रयत्नापेक्षा जाणीवपूर्वक डोळेझाक झाली. हे आजच्या अधोगतीचे एक कारण आहे.
स्वातंत्र्यानंतर भौतिक सुखसोयी खूप वाढल्या. पण माणूस सुसंस्कृत झाला काय ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला. जे शिक्षण मिळाले त्याने सुशिक्षित केले पण सुसंस्कृत नाही. स्वार्थी व्यवहारवाद वाढत गेला आणि नैतिकता कमजोर होत गेली. मूल्यशिक्षण हे एकूण सर्व विषयांच्या अभ्यासक्रमातून न जाता ते स्वतंत्रपणे द्यावे लागणे हे एक प्रकारचे अधःपतन होते व आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, आपल्याला अभिप्रेत असणारा समाजवाद शिक्षणाद्वारे येऊ शकेल. जोपर्यंत सर्वसामान्य जनतेला चांगले शिक्षण मिळत नाही, सर्वसामान्य जनतेला पोटभर अन्नाची जोपर्यंत खात्री दिली जात नाही, तोपर्यंत आपल्या राजकारणाला आणि धर्मकारणाला काडीचाही लाभ होणार नाही. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याच्याकडे मुळातच पूर्णत्व असते. पण त्याच्या प्रकटीकरणासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. त्यामुळे चारित्र्य घडवणारे, मानसिक बळ वाढवणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनवणारे शिक्षण मिळाले पाहिजे. सर्वांना समान शिक्षण जेव्हा मिळायला लागेल तेव्हाच सुधारणांची एक रचनात्मक पद्धती आकार घेईल. कोट्यावधी जनतेला उपाशी व अशिक्षित ठेवून त्यांच्या पैशावर मूठभर उच्चवर्णीय जर शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासारखे कृतघ्न आणि द्रोही तेच.” राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही शिक्षणाच्या बौद्धिक अंगापेक्षा सांस्कृतिक स्वरूपाला महत्त्व दिले होते. संस्कृती हा शिक्षणाचा पाया आहे हे असं ते म्हणत.आणि अर्थातच ही संस्कृती गंगा जमुनी संस्कृती होती. भारतीय राष्ट्रवादी होती. संकुचीत सांस्कृतिक राष्ट्रवादी नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.
स्वातंत्र्यानंतर शिक्षक दिन म्हणून साजरा होणारा ५ सप्टेंबर हा दिवस थोर तत्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशात झाला. आणि १६ एप्रिल १९७५ ते मद्रास येथे कालवश झाले. डॉ.राधाकृष्णन यांनी भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मौलिक स्वरूपाचे लेखन केले.अर्थात त्यांचे सर्वच लेखन सर्वमान्य होण्यासारखे नाही.पण त्यांनी आद्य शंकराचार्यांच्या केवल अद्वैतवादाची मांडणी आधुनिक काळाला सुसंगत अशी केली आहे हे नाकारून चालणार नाही. राधाकृष्णन यांनी शिक्षण विषयक चिंतनही केले होते. शिक्षणामुळेच व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते आणि स्वतःच्या विचारांची दिशा निश्चित करता येते हे त्यांचे मत महत्त्वाचे आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो पहिला शिक्षण आयोग नेमण्यात आला त्याचे ते अध्यक्ष होते. म्हणून त्यांचा जन्मदिन भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. १९३० साली झालेल्या अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे ते अध्यक्ष होते.१९५४ साली त्यांना ‘ भारतरत्न ‘या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अर्थात डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रमाणेच महात्मा फुले यांच्यापासून ते डॉ. जे. पी. नाईक यांच्यापर्यंत अनेकांनी शिक्षण क्षेत्रात अनमोल स्वरूपाची कामगिरी केली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.
आधुनिक भारताचा इतिहास लक्षात घेत आजचा शिक्षकदिन साजरा केला तरच आपल्याला भविष्याची दिशा नेमकी मिळू शकेल. असतांना कोरोना ने आता जगाची मांडणी कोरोना पूर्व आणि कोरनोत्तर काळ अशी केली आहे. अशावेळी हा कोरोनास्थित काळात आलेला शिक्षक दिन शिक्षणव्यवस्थेचा सर्वांगीण विचार करण्याचा दिवस म्हणून शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकाने ध्यानात घेतला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळातच १९०६ साली राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना मांडली गेली. सक्तीचे शिक्षण, मातृभाषेचे माध्यम, शरीरश्रमाचे महत्व आणि उत्पादन योग्य वेतन ही त्याची चतुसूत्री होती. त्यापूर्वी पंचवीस वर्षे म्हणजे १८८२ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन ला निवेदन दिले होते. त्यात १)केवळ वरिष्ठांना शिक्षण हा सरकारचा हेतू असणे चुकीचे आहे. २)जनतेच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे. ३)प्राथमिक शिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण केली पाहिजे. ४) उच्च शिक्षणावरील वारेमाप खर्च टाळला पाहिजे. ५)धंदे विषयक शिक्षण अग्रक्रमाने दिले पाहिजे. ६) शिक्षणावर सरकारी नियंत्रण हवे. ७) शिक्षणामध्ये स्त्री शिक्षण आणि मानवी हक्क यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे हे मुद्दे अधोरेखित केले होते.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक शिक्षण आयोग नेमले गेले. धोरणे आखली गेली. पण त्यासाठीच्या तरतूदी अभावी आजतागायत या व्यवस्थेचा खेळखंडोबा झालेला आहे. नुकत्याच आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाने हा खेळ अधिक प्रमाणात चालवलेला आहे. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिक्षकाने आणि शिक्षणक्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकांनी हे नवे शैक्षणिक धोरण तपशिलात समजून घेण्याची नितांत गरज आहे. कारण त्याखेरीज भारतीय शिक्षण व्यवस्था कोणत्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तिची दशा काय होण्याची शक्यता आहे हे कळू शकणार नाही.
भारतीय संविधानाच्या चौकटीतून शिक्षण गायब करणारी धोरणे आखली जात आहेत.लोकशाही पासून धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांनाच बाजूला सारले जाण्याचा धोका आहे. शिक्षणावरून व्यक्तीचे स्थान न ठरता त्याच्या स्थानावरून शिक्षणाची मर्यादा ठरवली जावी असा एक कुटिल हेतू या धोरणातून स्पष्ट होतो आहे. गेल्या तीन दशकांमध्ये विनाअनुदानित संस्कृतीने शिक्षणाचा गळा घोटला. त्यात जागतिकीकरणाने शिक्षणव्यवस्थेचा बाजार केला. किंबहुना लिलाव मांडला.शिक्षण व्यवस्थेत आता खाजगीकरण आणि धर्मांधीकरण याचा वेगाने शिरकाव होऊ लागला आहे. मुळात आज भारतातील ३००विद्यापिठात अंदाजे दीड कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचा अर्थ उच्च शिक्षण घेऊ शकणाऱ्या वयोगटातील केवळ सात टक्के विद्यार्थी या प्रक्रियेत आहेत.हे प्रमाण जर्मनीत४७ टक्के, स्वीडन, ब्रिटन, फ्रान्स मध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक, अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात ऐंशी टक्क्यावर आहे. या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भरता आणि महासत्तेचे स्वप्न बघत असताना नव्या शैक्षणिक धोरणात काय बदल केले आहेत हे पाहिले तर प्रगती पेक्षा अधोगतिची शक्यता जास्त वाटते. शिक्षकदिनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
नवे शैक्षणिक धोरण स्वीकारत असताना त्याच्या उद्देशात म्हटले आहे, ‘भारताला केंद्रस्थानी ठेवून उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करणे आणि राष्ट्राला सातत्याने न्याय व चैतन्यमय ज्ञानी समाजात परिवर्तित करणे.’ यासाठी हे आखले आहे. प्रवेशाची सुलभता, संधीची सुयोग्यता, गुणवत्तेला प्राधान्य,संधीची व्यापकता, जबाबदारीची जाणीव या पाच तत्वावर आधारित हे धोरण आहे. धोरण आणि त्यातील संकल्पना वाचल्या की भारताची वाटचाल कोणत्या दिशेने सत्ताधारी वर्गाला न्यायची आहे हे स्पष्ट होते. या धोरणाची भाषा इतकी शब्दबंबाळ आहे की, त्यातून आपल्या हाताला काय लागणार आहे याचा पत्ताच लागत नाही. मन की बात जशी समकालीन महत्वाच्या, ज्वलंत प्रश्नांपेक्षा तिसरीकडेच भरकटत जाते तसे ह्या धोरणाचे झाले आहे. टीआरपी कमी होणे, डीसलाईक वाढत जाणे याचे कारण लोकांना भाषणबाजी नव्हे तर निकाल हवा असतो.
भारतातील परंपरा आणि मूल्यव्यवस्था यांच्याशी सुसंगत असणारे आणि एकविसाव्या शतकातील महत्त्वाकांक्षी उद्देशांच्या पूर्ततेसाठी आवश्यक अशी रणनीती आखणारे हे धोरण आहे असे म्हटले आहे.
पण मुद्दा असा आहे की, भारताच्या नेमक्या कोणत्या परंपरा आणि कोणती मूल्यव्यवस्था सत्ताधारी वर्ग या धोरणातून पुढे आणू इच्छितो ? विषमतावादी धोरणे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था नव्या पद्धतीने विकसित करण्याचा हेतू तर नाही ना ? अशी शंका नव्हे तर खात्री पटावी अशा पद्धतीने या धोरणाच्या समर्थना बाबतची मांडणी होऊ लागली आहे. प्युअर सायन्स अर्थात शुद्ध विज्ञानावर आधारित, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित वाटचाल करणे गरजेचे आहे. चुकीच्या कालबाह्य परंपरा, मानव निर्मित विषमतेची तरफदारी करणारी मूल्यव्यवस्था अत्यंत निंदनीय आहे. याचा निषेध करून सर्वांगीण समताधारीत समाजव्यवस्था प्रस्थापित करणारी शिक्षण व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे.कारण भारतीय संविधानाने दिलेली मूल्यव्यवस्थाच सर्वश्रेष्ठ आहे आणि तीच स्वीकारली गेली पाहिजे.
आज वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे समाजातील एक मोठा वर्ग मोठ्या प्रमाणात पिचत चालला आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या सर्व स्तरांवर व्हावा व तो प्रामाणिकपणे वैज्ञानिक दृष्टीने व्हावा यासाठी विज्ञानाला लोकाभिमुख करण्याची गरज आहे. पण त्याऐवजी दैववादाची भलावण केली जाते. देशाच्या अर्थमंत्री बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला ‘देवाची करणी’ म्हणत असतील तर मग देवाधर्माच्या नावाने केल्या जाणाऱ्या राजकारणाला काय अर्थ उरतो ? सरकार नावाची यंत्रणा केवळ “रामभरोसे” चालते का ? हा प्रश्न विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टीने प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. विश्वविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी एके ठिकाणी म्हटले होते की, “ज्ञान हे दोन स्वरूपात असते. एक निर्जीव पुस्तकांमध्ये साठवलेले आणि दुसरे जिवंत लोकांच्या जाणीवांमध्ये.तसे पाहिले तर दुसरे स्वरूप हेच खरे महत्त्वाचे आहे .पहिले स्वरूप कितीही टाळता येत नसले तरी त्याचे स्थान दुय्यमच.” लोकांच्या जाणिवा वैज्ञानिक पातळीवर तयार करणे हे आपल्या पुढील मोठे आव्हान आहे आणि ते आपण पेलले पाहिजे हा शिक्षक दिनाचा संदेश आहे.
या धोरणामध्ये आकृतीबंधा पासून अभ्यासक्रमापर्यंत आणि शाळा संकुलाला पासून संशोधनापर्यंत सर्व क्षेत्रात काही बदल अपेक्षिलेले आहेत. पण हे बदल करत असताना शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे आणि उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलेली दिसत नाही. अनेक बाबी अंमलबजावणीच्या पातळीवर गोंधळ निर्माण करणाऱ्याआहेत. कोणत्याही पायाभूत सुविधांचे सार्वत्रिकीकरण आणि उपलब्धिकरण नसताना हवेत निर्णय घेणे चुकीचे असते. त्यामुळे हे नवे शैक्षणिक धोरण नोटबंदी आणि जीएसटी याच्या सारखेच केवळ अनर्थकारी नव्हे तर व्यवस्था उध्वस्त करण्याकडे नेणारे आहे. ज्याचे दीर्घकाळ परिणाम सर्वसामान्यांनाच भोगावे लागणार आहेत.
भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात बावीस भाषांना मान्यता दिली आहे. त्याशिवाय इतरही अनेक भाषा भारतात बोलल्या व लिहिल्या जातात. त्यांचा समावेश अभ्यासक्रमात समन्यायी पद्धतीने झाला पाहिजे.कारण त्याशिवाय बहुभाषिक संस्कृतीचे पालन-पोषण होणार नाही. पण इथे संस्कृत भाषेचाच जास्त आग्रह झालेला दिसतो. प्राथमिक शिक्षणाचे एक प्रकारचे सरसकटीकरण केले जात आहे. जिथे सक्ती होते तिथे ऐच्छीकता मारली जाते. आणि ऐच्छीकता मारली जाणे याचा अर्थ कौशल्य विकासात आडकाठी आणणे असा होतो. तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे समीकरण मांडण्यात आले आहे. पण आजच दहा लाखावर शिक्षकांच्या जागा आणि आणि उच्च शैक्षणिक संस्थांमधील सरासरी चाळीस टक्के जागा रिक्त आहेत. अशा परिस्थितीत ३० : १ हे समीकरण कसे अस्तित्वात आणणार ? त्यासाठीची आर्थिक तरतूद काय असणार ? याची चर्चाच केली जात नाही. याचे कारण शिक्षणाचे खाजगीकरण, व्यापारीकरण गृहीत धरलेले आहे हे उघड आहे. जगातील प्रगत देशांनी आपल्या जीडीपीच्या आठ ते दहा टक्के शिक्षणावर सातत्याने खर्च केला त्यावेळी ते प्रगत झाले आहेत.आणि आम्ही मात्र तो खर्च तीन टक्क्यांच्या वर नेट नाही , अर्थसंकल्पात त्याची तरतूद करत नाही आणि घोषणा मात्र मोठ्या करतो हे लक्षात घेतले पाहिजे. वास्तव आणि वल्गना यात फरक असतो तो असा. म्हणूनच हा शिक्षकदिन साजरा करत असताना जे इतर अनेक फाटे फोडले जात आहेत त्यापेक्षा शिक्षण व्यवस्थाच पोखरली जात आहे याचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे.
बाजारीकरण आणि धर्मांधीकरणाचे शिक्षण क्षेत्रावर आलेले आरिष्ट परतवून लावणे ही काळाची गरज आहे.त्यासाठी प्रत्येक सजग माणसाने प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान आठ ते दहा टक्के खर्च पुढील वीस वर्षे शिक्षणासाठी राखीव ठेवायला हवा. कमवा आणि शिका सारख्या योजनांचा सार्वत्रिक अंगीकार करायला हवा. शरीर श्रमाला प्रतिष्ठा देणारे शिक्षण दिले पाहिजे. उच्च शिक्षण क्षेत्रात परकीय विद्यापीठांचे आक्रमण थांबून भारतीय विद्यापीठे बलशाली केली पाहिजेय या व यासारख्या इतर मागण्या घेऊन लढले पाहिजे. ‘अच्छे दिन ‘केवळ घोषणा करून येत नसतात आणि ‘आत्मनिर्भरता’ तोंडाच्या वाफेतून जन्म घेत नसते. याचे शिक्षण सत्ताधाऱ्यांना सामान्य जनतेतून दिले जाणे गरजेचे आहे. अन्यथा धर्मांध व भांडवली शक्तींना अच्छे दिन “आणि सर्वसामान्य जनतेचा ‘बुरा हाल’ होऊ शकतो. याचे भान या कोरोना कालीन शिक्षकदिनी आपण ठेवले पाहिजे ती आजच्या उद्याच्या काळाची मागणी आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणे हाच आजच्या दिवसाचा अन्वयार्थ आहे.
प्रसाद कुलकर्णी,
लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.