अहमदनगर : लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुधन मंत्री व कृषीमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
डॉ. नवले म्हणाले, जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी स्किन आजाराने राज्यातील पशुधनाला विळखा घातला आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने राज्यातील पशुधन व दुग्ध व्यवसाय या आजारामुळे धोक्यात आला आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमधील 218 गावे या आजाराने प्रभावित झाली आहेत. 34 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा आजार मोठ्या प्रमाणात संसर्गक्षम असल्याने प्रभावी उपाय योजना न केल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. शिवाय दुग्ध व्यवसाय कोलमडून पडू शकतो.
राज्य सरकारने लम्पी प्रभावित भागाला ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. जनावरांची नियंत्रित क्षेत्रात किंवा त्या क्षेत्राबाहेर ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आजारग्रस्त जिवंत किंवा मृत जनावरांच्या संपर्कात आलेली वैरण नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. जनावरांचा बाजार, शर्यती, जत्रा, भरवण्यासही मनाई करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या उपायोजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. मात्र केवळ एवढे करून भागणार नाही याची जाणीवही राज्य सरकारने ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही नवले म्हणाले.
राज्य सरकारने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री व पशुधन विकासमंत्री यांच्या प्रमुख समन्वयातून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टास्क फोर्स गठीत करावे, पशुधन विकास विभाग, महसूल विभाग व कृषी विभागाच्या समन्वयाने तालुकास्तरावर कृती दल गठीत करून प्रतिबंध व उपचार या दोन्ही पातळीवर काम करावे, ज्या भागात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या सर्व भागांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करावी, शेतकऱ्यांमध्ये विशेष जनजागृती करण्यासाठी तातडीने मनुष्यबळ तैनात करावे अशा मागण्या किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख यांनी केली आहे.