मुंबई, दि. 21 : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे (Alok Aradhe) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे मंगळवारी (दि. 21) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते. शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्या. आराधे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्या. आलोक आराधे यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
न्या. आलोक आराधे (Alok Aradhe) यांचा जीवन परिचय
न्या. आलोक अराधे यांचा जन्म १३ एप्रिल १९६४ रोजी रायपूर, छत्तीसगड येथे झाला. त्यांनी १२ जुलै १९८८ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात त्यांनी नागरी आणि घटनात्मक प्रकरणांवर काम केले. एप्रिल २००७ मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. २९ डिसेंबर २००९ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश व १५ फेब्रुवारी २०११ रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. न्या. आराधे २० सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि ११ मे २०१८ रोजी हंगामी मुख्य न्यायमूर्ती झाले. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती. ३ जुलै २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२२ त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पहिले. दिनांक १९ जुलै २०२३ रोजी त्यांची तेलंगाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली.
न्या. आलोक अराधे यांनी मध्यस्थी व सामंजस्य केंद्रे, न्यायिक अकादमी, तसेच कायदेशीर सेवा प्राधिकरणांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या विविध अंगांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


हे ही वाचा :
अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान
भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल
धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !