सुरगाणा / दौलत चौधरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमझर येथील पशुपालक चिंतामण गंगाजी वाघमारे वय 47 या इसमाच्या तेरा बक-यांवर वाघाने हल्ला करुन ठार केले.
याबाबतचे वृत असे की, रविवार 4 जुलै रोजी आमझर गावात आदिवासी पारंपरिक पद्धतीने रानभाजी तेरा खाण्याचासण होता. त्यामुळे पशुपालकाने जंगलात चारण्याकरीता घेतलेल्या पंधरा ते वीस बक-या जंगलात सोडून तो सण असल्याने निघून आला. नेहमी प्रमाणे अंधार पडला की बक-या जंगलातून घराकडे परतायच्या मात्र शेतातील झापावर बक-या परतल्याच नाहीत. तेरा बक-या जंगलातील भोवर हेदीचा दरा येथेच राहिल्या याच द-यात खडकाची कपार असल्याने वाघाचा (आदिवासी बोलीत टेंभुरुण्या खड्या) चा अधिवास असतो. रात्रीच्या सुमारास बक-यांच्या कळपावर अचानकपणे हल्ला चढवून हल्ला केला. यापैकी अकरा बक-या ह्या एका जागेवर मृतावस्थेत आढळून आल्या तर दोन बक-यांचा अजूनही तपास लागलेला नाही. शेतक-याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे.
हा भाग गुजरात राज्याचा सिमावर्ती भागा लगतचा राखीव जंगलाचा आहे. त्यामुळे अशा घटना पावसाळ्यात नेहमीच घडत असतात. काही दिवसापुर्वी याच शेतक-याचा गायीचा गो-हाचा फडशा पाडला होता. सदर घटनेचा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र ढुमसे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली असून पंचनामा करण्यात आला आहे. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.ललिता नाळे यांनी शवविच्छेदन केले असून अहवाल वनविभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमझर येथील ज्येष्ठ नागरिक परशराम भोये यांनी सांगितले की, “वाघ बक-या सोबत ‘ससुली’ हा खेळ खेळत असतो त्यावेळी जेवढ्या बक-या तावडीत सापडल्या तेवढ्या फक्त मारून टाकतो.”