Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणसुरगाणा : पोश्शा हो शाळा भरली रं... गुरुजी आलंय...

सुरगाणा : पोश्शा हो शाळा भरली रं… गुरुजी आलंय…

spot_imgspot_imgspot_imgspot_img
जिल्हा परिषद शाळा माणी येथे विद्यार्थ्यांना मास्क वाटप करताना पालक व शिक्षक वृंद

सुरगाणा तालुक्यात अखेर दीड वर्षानी १६६ शाळेची घंटा वाजली !

सुरगाणा, ता.४ (दौलत चौधरी) : पोश्शा हो, शाळात येजास रं ! गुरुजी आलंय शाळा सुरु झाली रं… शाळा उघडली. या हाका आहेत आदिवासी बोलीतील वाडा, पाडा, वस्तीवरील आदिवासी मुलांच्या तोंडून बाहेर पडलेल्या हाका. अगदी आतुरतेने शाळा कधी उघडणार अशी चातकासारखी वाट पाह पाहणारी मुलांच्या हाका.. अगदी डोंगर दरी खो-यात सकाळी सकाळी कानी आलेले शब्द. तर कुठे पालक एकमेकांना सांगत होते. गण्यालं आज दोबडां चाराया नको दवाडशील  शाळेत पाठवजोस कालच गुरुजींनी सांगतलांय… पारुलं बकऱ्या वाळायला नको शाळेत पाठवजो. तर कुठे ताईला पोरां सांभाळायला घरी ठेवशील नको शाळेत पाठवजो.. मास्तर बाईंनी कालच सांगलाय, अशी आदिवासी बोलीतील हाका अगदी सकाळी सकाळी कानी पडत होत्या. यावरून आदिवासी पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटले असल्याचे जाणवत होते तर दुसरीकडे पाल्याची शिक्षणाविषयी चिंता जाणवते होती.

सुरगाणा तालुक्यात अखेर १६६ शाळेची घंटा वाजली. शाळेत उपस्थिती करीता पालकांचे संमती पत्रक आवश्यक. कोरोना काळात आदिवासी भागात पुरेसे मोबाईल नेटवर्क, ॲन्ड्राईड मोबाईल आदी समस्यांना सामोरे जावे लागले होते. विद्यार्थी वाडी, वस्तीवर रहात असल्याने पावसाळ्यात काहींना नदी, नाले, ओढे पार करून जाता येत नव्हते. मात्र प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अतिदुर्गम भागातील मानी, बा-हे, करंजुल, पांगारणे, उंबरठाण, हस्ते, खिर्डी, भाटी, मांधा, रघतविहीर, बर्डीपाडा, खोकरविहीर, राक्षसभूवन, पिंपळसोंड, खुंटविहीर आदी भागात शाळा सुरु झाल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार तालुक्यातील ग्रामीण भागात  पाचवी ते बारावीचे १६६ वर्ग करोनाचे नियम पाळून भरविण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. शालेय वर्ग खोल्यांचे तसेच शालेय परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले, यावेळी महेश देशमुख, नाना जाधव, रामा धूम, दिलीप जाधव यांनी मुलांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शंभर मास्क इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.

शिक्षण विभागाने शाळांमधील सुरक्षिततेची पहाणी करण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. करोना महामारीमुळे संपूर्ण शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून आता परिस्थिती हळूहळू पुर्व पदावर येऊ लागली आहे. सध्या पालकांचे संमती पत्रक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे करोना काळात दुरावलेल्या आपल्या बालमित्रांना तसेच शिक्षकांना  भेटण्याची आतुरता दिसून आली तर शाळेविषयी  विद्यार्थ्यांना उत्कंठता तसेच ओढ निर्माण झाल्याचे दिसून आले. दीड वर्षापासून दुरावलेल्या मित्रांना  जवळून भेटण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वर्गात पहिल्याच तासाला विद्यार्थी गप्पा, टप्प्यात रममाण झाले होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय