वडवणी, ता.२८ (लहू खारगे) : वडवणी तालुक्यातील परभणी तांड्यावरील ४२ वर्षीय ऊसतोड कामगार व अल्पभूधारक शेतकऱ्याने २८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. खळवट लिमगाव मधील दोन व कवडगाव याठिकाणी एका शेतकऱ्याने याच महिन्यात आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सततची नापिकी, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, कर्जबाजारीपणा आणि न मिळालेला विमा हे शेतकऱ्यांच्या झालेल्या या आत्महत्येचे एकच कारण समोर आले आहे.
परभणी तांड्यावरील संदीपान रामा पवार (वय ४२ वर्षे) तालुका वडवणी या शेतकऱ्याला केवळ दिड एकर शेती असुन वडिलांकडे गावातील काही खाजगी आणि सावकारांचे देणं होतं. काही दिवसांपूर्वी वडिलांचे देखील निधन झाले. तसेच अतिवृष्टीने शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यावर्षीचाच काय तर गेल्या वर्षीचा सुद्धा पीक विमा मिळालेला नाही. घरचा प्रपंच, दुकानांची उधारी आणि खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून संदीपान पवार या शेतकऱ्याने घराशेजारी असलेल्या लिंबांच्या झाडाला २८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आपले जिवन संपवले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं, मुलगी भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, सदरील शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.