बीड :ऊसतोड व वाहतूक मुकादम कामगारांच्या मजूरी, वाहतूक खर्च आणि कमिशन वाढीच्या मुद्यावरून गेल्या २० दिवसापासून सुरु असलेल्या ऊसतोड वाहतूक मुकादम कामगारांचा संप चिघळला असून २७ ऑक्टोबर रोजी बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सिटू प्रणित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. दत्ता डाके यांनी दिला आहे.
कामगार संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात चार बैठका निष्फळ ठरल्या आहेत. उसतोडणी कामगारांच्या दरात ४०० प्रतिटन वाढ करून वाहतूकीचे दर डिझल दरवाढ प्रमाणे करावे, मुकादम कमिशन २५ % करावे, इतर मागण्यासाठी बीड, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, तेलगाव, परळी तालुक्यातील सिरसाळ, धारूर, माजलगाव, छत्रपती साखर कारखाना सवारगाव, गेवराई, येथे सिटूच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
तसेच पंकजा मुंडे यांनी २१ रोजी अंबाजोगाई येथे मेळाव्यात २१ रुपये वाढ द्या, अशी मागणी केली ही मागणी मान्य नसल्याचे सिटू ने म्हटले आहे.
ऊसतोडणी कामगारांसाठी सरकारने घोषित केलेल्या कल्याणकारी महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करावे, सन २०२० – २१ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसतोड व वाहतूक कामगार मुकादम ऊस वाहतूकदार यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र व सेवा पुस्तिका देण्यात यावे, या महामंडळासाठी निधी उभारण्यासाठी राज्यातील साखर उत्पादनावर किमतीच्या १ टक्का इतका उपकर लागू करावा, ऊस तोडणी व वाहतूक कामगारांना बस पाळी भत्ता सुरू करा, बस पाळी दिवसाचे बैलगाडीचे भाडे कारखान्यांनी रद्द करावे, ऊस तोडणी कामगारांना लागू असलेल्या पद्मश्री डॉ विखे पाटील अपघात विमा योजनेअंतर्गत प्रत्येक कामगारांना पाच लाख रुपयांचा तसेच बैलजोडीचा एक लाख रुपयाचा तसेच बैलगाडी व झोपडी याचा विमा उतरवावा विम्याचा प्रिमियम चे पैसे ५० टक्के साखर कारखान्यांनी व ५० टक्के राज्य सरकारने भरावेत, स्थलांतरित ऊस तोडणी वाहतूक कामगारांना कामावर जाताना सहा महिन्याचे रेशन एकदम द्यावे किंवा साखर कारखान्याच्या ठिकाणी रेशनवरील धान्य पुरवठा करण्यात यावा, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक मध्ये जाणाऱ्या ऊस तोडणी व वाहतूक कामगारांची नोंदणी करून आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याप्रमाणे सुविधा पुरवाव्यात, ऊसतोडणी व वाहतूक कामगारांना साखर कारखान्यांना कडून मोफत वैद्यकीय उपचार सुविधा आणि बैलांना खुरकतावरील लस द्यावी, ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या मुलामुलींसाठी त्यांच्या गावी निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात यावे, या मागण्यांंचे निवेदन प्रशासन मार्फत साखर संघ व मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
तेलगाव येथील आंदोलनात कॉ. दत्ता डाके, सय्यद रज्जाक, अँड. अशोक डाके, सुभाष डोंगरे, बाळासाहेब चोले, रामा राऊत तर सिरसाळ येथे आणासाहेब शिंदे, भक़्तराज शिंदे, सुदाम शिंदे, विशाल देशमुख, सखाराम शिंदे, प्रवीण देशमुख, मुरलीधर नागरगोजे, पंडित शिंदे, विश्वजीत शिंदे, पवन शिंदे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.