Thursday, April 25, 2024
Homeआंबेगावविद्यार्थी कार्यकर्ता - नेता - दुकानदार - पीएचडीचा विद्यार्थी ते नार्वे देशापर्यंत...

विद्यार्थी कार्यकर्ता – नेता – दुकानदार – पीएचडीचा विद्यार्थी ते नार्वे देशापर्यंत झेप घेणारा दुर्गम आदिवासी भागातील सोमनाथ निर्मळ

जुन्नर : जुन्नर तालुक्याची मान उंचविणारी कौतुकास्पद गगनझेप कामगिरी दुर्गम आदिवासी भागातील हातवीज येथील सोमनाथ निर्मळ यांनी केली आहे. प्रतिकुल परिस्थितीत आणि अनेक संकटांवर मात करत सोमनाथने नॉर्वे (युरोप) देशापर्यंत मजल मारली आहे.

सध्या सोमनाथ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्रुती तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील आदिवासींचे उच्च शिक्षण: धोरणे व साह्याकारी व्यवस्था’ या विषयावर पीएचडी करत आहे. नुकतेच इंटरनॅशनल विसीटिंग फेलोशिप (International Visiting Fellowship) अंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ईस्टर्न नॉर्वे (University of South Eastern Norway (USN) येथील संशोधन अभ्यासासाठी सोमनाथची निवड झाली आहे. येत्या 10 ऑगस्टला सोमनाथ नॉर्वे (युरोप) साठी रवाना होणार असून तीन महिने तो तेथे Childhood, welfare and culture या कोर्सचे शिक्षण घेणार आहे.

जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत एवढी मोठी झेप घेणारा सोमनाथ कदाचित पहिलाच विद्यार्थी असेल.

सोमनाथने दहावीमध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सोनावळे येथे प्रथम क्रमांक मिळविला. यानंतर श्री शिव छत्रपती महाविद्यालयात प्रवेश घेत पुढील शिक्षणास सुरुवात केली. येथेच त्याची ओळख स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेशी झाली आणि सोमनाथच्या आयुष्यात सामाजिक जाणीवांची सुरूवात झाली. फी वाढ विरोधी विविध आंदोलने, वसतिगृहाच्या प्रश्नांवर आंदोलने, दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन हे करत सोमनाथने बारावीमध्ये कला शाखेत तृतीय क्रमांक मिळाला. एवढेच नव्हे तर एन एस एस मध्ये बेस्ट स्टुडंट्स अवार्ड, तसेच पदव्युत्तर पदवी घेत प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी ‘सेट’ ही पात्रता परिक्षा उत्तीर्ण होऊन नॅशनल फेलोशिप फॉर शेड्युल ट्राईब स्टुडंटस (NFST) मिळवत सध्या पीएचडी करत आहे. सध्या सोमनाथ स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा केंद्रीय समिती सदस्य व राज्य उपाध्यक्ष आहे.

इतकेच नव्हे, सोमनाथ म्हणतो, शोषणावर आधारीत व्यवस्था बदलण्यासाठी जुन्नरमध्येच राहून काम करायचे ठरवले. सोमनाथ ने पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर 2017 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून तत्कालीन निरगुडे गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवली. त्यांनतर जुन्नर येथे कपड्याचे दुकानही सुरू केले. व्यवसायात आलेल्या अपयशाने खचून न जाता संघर्ष चालू ठेवला. पुन्हा पुणे गाठले आणि अभ्यास चालूच होता. नॅशनल फेलोशिप फॉर शेड्युल ट्राईब स्टुडंटससाठी निवड झाली आणि पुणे विद्यापीठात पीएचडी करू लागलो. आता, नार्वे देशात जाण्यासाठी मिळालेल्या संधीचा आपल्या देशासाठी नक्की उपयोग होईल.

सोमनाथ सोबत अभिजित कांबळे, विष्णू वैरागड, तरबी लोयी, शायरी रॉय चौधरी, प्रकृती मुखर्जी, तिस्ता चंद्रा हे विद्यार्थीही नॉर्वेला (युरोप) जाणार आहेत.

सोमनाथचे वडील गोविंद निर्मळ, आई आनाबाई निर्मळ यांना अतिव आनंद झाला आहे. सोमनाथच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर समाजातल्या सर्वच घटकांतून अभिनंदन केले जात आहे. या निमित्ताने जुन्नरमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय