Saturday, October 12, 2024
Homeजिल्हाअहमदनगर : निळवंडे उच्चस्तरीय कालव्यासाठी अकोलेत संघर्ष समितीची जोरदार निदर्शने !

अहमदनगर : निळवंडे उच्चस्तरीय कालव्यासाठी अकोलेत संघर्ष समितीची जोरदार निदर्शने !

अकोल्यात शेतकरी आंदोलनास डॉ. अजित नवले संबोधित करताना 

अकोले : निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचे काम तातडीने पूर्ण करुन सर्व वंचित शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये पाणी उपलब्ध करून द्या या प्रमुख मागणीसाठी निळवंडे पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने आज अकोले येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. 3 सप्टेंबर 2021 रोजी उच्चस्तरीय कालव्यांच्या कामांना गती मिळावी या  व इतर मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या वतीने अकोले बाजार तळावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या वेळी मार्च अखेरपर्यंत उच्चस्तरीय कालव्यांची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आंदोलनानंतर चार महिने उलटून गेले तरी उच्चस्तरीय कालव्यांच्या कामांना पुरेशी गती मिळालेली नव्हती. या पार्श्वभूमीवर ही निदर्शने करण्यात आली. 

शासन व प्रशासनाच्या वतीने आ. डॉ. किरण लहामटे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे साहेब, अधीक्षक अभियंता, अरुण नाईक तहसीलदार सतीश थेटे यावेळी उपस्थित होते.

निळवंडे उच्चस्तरीय कालव्याचा प्रश्न तत्काळ सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन – शेतकरी नेते अजित नवले

प्रवरा नदी पात्रात होत असलेल्या जलसेतूच्या कामाला गती देऊन जलसेतूचे काम  मार्च अखेर पर्यंत पूर्ण करा, उच्चस्तरीय पाईप कालव्याच्या लाभक्षेत्राचा विस्तार करून वंचित शेतकऱ्यांना पाणी द्या, निळवंडे पाटात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा रास्त मोबदला द्या व त्यांचे पुनर्वसन करा. पाट बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरी द्या, उच्चस्तरीय कालव्यांच्या न्याय्य सिंचन परीचालनासाठी डाव्या व उजव्या कालव्यांसाठी स्वतंत्र पाणी वाटप संस्थांची स्थापना करा या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

आमदार डॉ. किरण लहामटे यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना आंदोलनकर्ते

तालुका स्तरावरील मागण्या तातडीने निकाली काढण्यात आल्या. उर्वरित मागण्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात तातडीने बैठक घेऊन याबाबत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आ. डॉ. किरण लहामटे यांनी उपस्थितांना दिले. 

मागण्यांसाठी मंत्रालयात बैठक घेऊन कारवाई करणार – आमदार डॉ. किरण लहामटे

मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन मार्च अखेरपर्यंत उच्चस्तरीय कालव्याची कामे पूर्ण झाली नाहीत व वंचित शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उच्चस्तरीय कालव्यांचे विस्तारीकरण झाले नाही, तर तहसील कार्यालयासमोर शेतकरी बेमुदत उपोषणासाठी बसतील असा इशारा यावेळी डॉ. अजित नवले यांनी दिला. 

सीताराम गायकर, शांताराम गजे, बाळासाहेब भोर, डॉ.रवी गोरडे, सुरेश भोर, महेश नवले, आप्पासाहेब आवारी, मच्छिंद्र धुमाळ, अशोक देशमुख, सुरेश नवले, गणेश पापळ, रमेश आवारी, बाळासाहेब आवारी, नारायण जगधने, रमेश शिरकांडे, किरण गजे, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, संदीप शिंदे, मच्छिंद्र पानसरे, निता आवारी, अनिता गजे, रेश्मा कानवडे यांची यावेळी भाषणे झाली.


संबंधित लेख

लोकप्रिय