मुंबई : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करत असल्याचे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे.
डॉ. नारकर म्हणाले, राज्यातील शेतकरी-शेतमजुरांपासून शासकीय कर्मचारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत सारी जनता केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराने त्रस्त झाली आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी शासनापुढे आग्रह करणे, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आपले मत संघटितपणे मांडणे हा जनतेचा घटनात्मक अधिकार आहे.
आज देशाचे पंतप्रधान नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्या निमित्ताने जनतेला ग्रासणाऱ्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी माकपच्या आणि इतर धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी पक्षांच्या वतीने पंतप्रधानांना भेटण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांनी भेट देण्याचे सौजन्य तर दूरच, परंतु महाराष्ट्र शासनाने माकपचे नेते डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड यांना त्यांच्या घरातच स्थानबद्ध केले आहे. तसेच, कॉ. जे. पी. गावीत, कॉ. सुनील मालुसरे यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. शासनाच्या या दडपशाहीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य कमिटी तीव्र निषेध करत असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या निर्यातबंदीमुळे धुळीस मिळाला आहे, दूध उत्पादक जेरीस आले आहेत, अंगणवाडी सेविका आपल्या न्याय्य हक्कांसाठी गेले चाळीस दिवस संपावर आहेत, मागोमाग आजपासून आशा कर्मचारी संपावर जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील या सेविकाही पंतप्रधानांना भेटून आपले गाऱ्हाणे सांगू इच्छित होत्या. अशा अंगणवाडी सेविकांनाही पोलिसांनी ठिकठिकाणी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात अडकवून ठेवले आहे. माकप या जुलूमशाहीचाही तीव्र निषेध करत असल्याचे डॉ.नारकर म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेल्या शिंदे-फडणवीस आणि अजित पवार सरकारने ही पाशवी दडपशाही करून आपले खरे जनताविरोधी रूप दाखवले आहे. जनता रस्त्यावरील आणि निवडणुकीच्या लोकशाही लढ्यात भाजपप्रणित केंद्र आणि राज्य सरकारांना आपली जागा दाखवून देईल, याची खात्री आहे, असल्याचा विश्वासही डॉ.नारकर यांनी म्हटले आहे.