नंदुरबार : अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करून अवैध्यरित्या भ्रूणहत्या करणा-या आरोपींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,दिलीप वळसे पाटील गृहमंत्री , जिल्हाधिकारी नंदूरबार, पोलीस अधिक्षक नंदुरबार, पोलीस निरीक्षक शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,ब्राम्हणपूरी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील एका 11 वर्षाच्या अल्पवयीन आदिवासी मूलीवर वारंवार बलात्कार केले व गर्भवती करून अवैध्यरित्या भ्रूणहत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो.घटनेतील संशयीत आरोपी पंकज मंगा पाटील व त्याला मदत करणारे अंबालाल पाटील, शांत्या पाटील, बु-या शांता पाटील व भ्रूणहत्या संबंधीत डाॅक्टर व नर्स यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतीबंधक कायदा, पोक्सो, भ्रूणहत्या व इतर विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी शहादा येथील ब्राह्मणपूरी येथे आलेल्या गरीब आदिवासी कुटुंबातील 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार संशयीत आरोपीने केला आहे. आपले पाप लपविण्यासाठी पाच महिन्याचा अवैध्यरित्या गर्भपात घडवून भ्रूणहत्या केली आहे. मुख्य आरोपीसह त्याला मदत करणारे आरोपी डाॅक्टर व नर्स हे या प्रकरणात तेवढेच दोषी आहेत. आदिवासी समाजाच्या मुली व महिलांचा असहायतेचा व गरीबीचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे कायमचे थांबविणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून सदर प्रकरण जलद न्यायालयात चालवण्यात यावे व आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी पावरा यांनी केली आहे. अन्यथा आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.