सोलापूर : सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांची एजंटांकडून होणारी लूट तात्काळ बंद करण्याच्या मागणीला घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सेतू कार्यालयात शिक्षणासाठी लागणारे विविध दाखले काढण्यासाठी शिक्षित व अशिक्षित पालक आपल्या पाल्यांना घेऊन येत असतात. पण येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास व पालकास कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही. आणि तुच्छ भाषा वापरून बाहेर हाकलले जात आहे. कार्यालय परिसरात एजंटचा सुळसुळाट असूनही तेथे सेतू कर्मचारी व अधिकारी बोलत नाहीत
सेतू कार्यालयातून मिळणारे दाखले उत्पन्न व रहिवासी हे दाखले वेळेवर सह्या होऊन मिळत आहेत. पण जातीचे व नॉन क्रिमिलियर हे दाखले मात्र एक ते दीड महिन्यापासून पेंडिंग आहेत. सह्या करून पुढे पाठविण्यात आले नाहीत. सह्या का झाल्या नाहीत, याचे कारणही सांगितले जात नसल्याचे एसएफआय ने म्हटले आहे.
सध्या दहावी व बारावी परीक्षा निकाल जाहीर झाला असून पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक कॉलेजने आपला प्रवेश फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरून घेत आहेत. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्र (दाखले) सेतू कार्यालयातून वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. आधीच कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थी सहा महिन्यापासून घरीच बसून आहेत.
सेतू कार्यालयातून मिळणारे विविध प्रकारचे दाखले तात्काळ विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. सेतू कार्यालय कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना व पालकांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे. सेतू कार्यालयात एजंटगिरी बंद करा. सेतू कार्यालयाच्या परिसरात दिसणाऱ्या एजंटांवर खडक कारवाई करावी, तसेच सर्व मागण्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एसएफआय ने दिला आहे.
निवेदन देताना एफएसआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हा सहसचिव शामसुंदर आडम, माजी जिल्हा सचिव मीरा कांबळे, अश्विनी मामड्याल, कृष्णा आडम इत्यादी उपस्थित होते.