रत्नागिरी, ता. १३ : राज्यातील शासकीय आदिवासी वसतिगृह आणि समाज कल्याण वसतिगृह त्वरित सुरू करावी, अशी मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, समाजकल्याणमंत्री, आयुक्त आदिवासी विभाग नाशिक, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ४ ऑक्टोबर पासून शासन निर्णयानुसार राज्यातील सर्वच शाळा, महाविद्यालयांनी इ. ८ ते १२ पर्यतचे वर्ग सुरू करण्यात आले. राज्यात बऱ्याच भागात कोविड-१९ चे नियम पाळून १५ जुलैपासूनच अनेक शाळा, महाविद्यालये नियमितपणे सुरू आहेत. मात्र, राज्यातील अनेक शासकीय आदिवासी आणि समाज कल्याणची वसतिगृहे अद्यापही बंदच आहे. त्यामुळे तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अगोदरच कोविडमुळे दीड वर्षापासून विद्यार्थी शिक्षणापासून लांब आहे. विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी अद्यापही बंद असलेले वसतिगृह त्वरित सुरू करावीत, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने सरकारकडे केली आहे.