Saturday, March 15, 2025

‘शेतकरी वाचवा- लोकशाही वाचवा’ देशव्यापी आंदोलनाला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद!

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपतींना देण्याकरिता सादर केले संयुक्त किसान मोर्चाचे रोषपत्र

मुंबई, दि. २६ : केंद्र सरकारने संमत केलेले शेतकरी विरोधी ३ कृषी कायदे, ४४ कामगार कायदे रद्द करून संमत केलेल्या ४ श्रम संहिता आणि प्रस्तावित वीज विधेयक तात्काळ रद्द करावे तसेच देशावर लादलेली अघोषित आणीबाणी याविरोधात आज २६ जून २०२१ रोजी संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेनुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी तीव्र निषेध निदर्शने करण्यात आली. 

या आंदोलनात ‘अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र) मध्ये सामील विविध शेतकरी संघटना आणि राज्यातील प्रागतिक राजकीय पक्ष सामील झाले होते. राजभवन-मुंबई या ठिकाणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शेतकरी कामगार पक्षाचे प्रा.भाई एस.व्ही.जाधव, ॲड.राजेंद्र कोरडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. महेंद्र सिंह, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले, लोकसंघर्ष प्रतिभा शिंदे, बीआरएसपी ॲड. सुरेश माने, समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आजमी,  जेडीजसचे सुहास बने आणि जेएएसएस विश्वास उटगी या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि त्यांना राष्ट्रपतींकरिता देण्याचे रोषपत्र सादर केले. 

यावेळी झालेल्या चर्चेत शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेविरोधी केंद्र सरकारने संमत केलेले उपरोक्त सर्व कायदे त्वरित रद्द करावे अशी मागणी केली. देशात आज अघोषित आणीबाणी सदृश वातावरण तयार केले गेले आहे याबद्दल तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला.

ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर संध्याकाळी ४.०० वा. निषेध निदर्शनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे प्रा.भाई एस.व्ही. जाधव, कॉ. महेंद्र सिंह, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे, ॲड. सुरेश माने, मेराज सिद्धिकी, प्रभाकर नारकर, कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. सोन्या गिल, कॉ. प्रीती शेखर, पूनम कनोजिया आदी वक्त्यांची भाषणे झाली. प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन ॲड. भाई राजेंद्र कोरडे यांनी तर समारोप कॉ. शैलेंद्र कांबळे यांनी केला.

मुंबई प्रमाणेच ठाणे, गडचिरोली, लातूर, बीड, कोल्हापूर, पुणे आदि ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि समविचारी पक्ष संघटनांनी तीव्र निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles