28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामांचा शोध लावला तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन सर्व महाविद्यालय, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.
भारत आपल्या विविध कल्पनाशक्ती, इच्छाशक्ती आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळात वैज्ञानिक क्षेत्रात आणि वैद्यकीय तसेच संशोधन क्षेत्रात प्रगती करत आहे. एकविसाव्या शतकामध्ये ही भारताची प्रगती संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. नवीन यंत्रे, तंत्रज्ञान वेगळ्या प्रकारचे शोध, संशोधन आणि माहिती मध्ये सातत्याने होणारे बदल हे सर्व विज्ञानामुळे शक्य होत आहेत. आपल्या समाजातील अंधश्रद्धा होत्या त्या ज्ञानामुळेच नष्ट झाले आहेत. हे भारतातील एक चांगला प्रगतीचे लक्षण मानलं जातं.
आपल्या दैनंदिन आयुष्यात विज्ञानाने कब्जा केला आहे. अगदी सकाळी गजराचे घड्याळ हे सुद्धा विज्ञानाचा एक अविभाज्य भाग आहे. मोबाईल शिवाय तर आपण राहू शकत नाही. आपल्या दिनचर्या मध्ये छोट्या मशीन पासून ते अवजड यंत्रा पर्यंत सगळी विज्ञानाची किमया आहे.
विज्ञानाने कृषी क्षेत्रात देखील खूप मोठी क्रांती केली आहे. लाकडाच्या नांगरापासून ते ड्रोन च्या सहाय्याने पिकांची फवारणी करणे पर्यंत विज्ञानाचे विविध टप्पे हे कृषी क्षेत्राने जवळून पाहिले आहेत. हरितक्रांती हा त्याचाच परिणाम तसेच भविष्यकाळात येणारे धोके ओळखून पिके निवडण्याचा अधिकार सुद्धा शेतकऱ्याला विज्ञानाने प्राप्त करून दिला आहे. येणारा जाणारा पाऊस, वाऱ्यांची दिशा, तापमानामध्ये बदल याचा अंदाज लावणे हे सर्व विज्ञानाच्या साह्याने शक्य झाले आहे.
विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान हे संजीवनी ठरले आहे. त्यांच्यासाठी ब्रेल लिपीतून ग्रंथालय करण्यामध्ये विज्ञानाची खूप मोठी भूमिका आहे. विज्ञानाच्या साह्याने कृत्रिम अवयव प्रत्यारोपण करून शस्त्रक्रिया यशस्वी झालेले आहेत. आपल्याला एकविसाव्या शतकात ज्या सुख सुविधा उपलब्ध झाले आहेत त्यामागे विज्ञानाची खूप मोठी भूमिका आहे. त्यामुळे परंपरावादी, रूढीवादी मागास विचारांचा त्याग करून आपण विज्ञानवादी विचारांची कास धरली पाहिजे तरच भारतीय समाजाची प्रगती होईल यात शंका नाही. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा !
– रत्नदिप सरोदे, बारामती
(मुक्त पत्रकार)