जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्धितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रुपांतर होऊन हिंदुपदपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले. भारतातील सर्वांत शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात होते. शिवरायांचा महत्त्वाचा गुण म्हणजे कमालीचा साधेपणा होय. सैन्याबरोबर राहून त्यांनी सर्व कसोटीच्या व संकटाच्या प्रसंगाना आनंदाने तोड दिले.
संपूर्ण जगातील सेनानायकाच्या क्रमांकात शिवाजी महाराजांचे स्थान प्रथम दर्जाचे आहे. १६४५-१६८० या शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीत सामर्थशाली मोगलांचा किवा विजापूरकरांचा असा एकही हिंदू किवा मुस्लिम सेनानायक नव्हता की, ज्यांचा महाराजांनी पराभव केला नाही. शहाजादे, इराणी व पठाण सरदार तसेच जसवंतसिंह राठोडसारखे राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायापुढे हात टेकले होते. वैयक्तिक शौर्य, संघटक व नायक म्हणून शिवाजीराजे अग्रगण्य ठरले होते. अफजलखानाशी केलेले युद्ध, शायस्तेखानावर छापा, सुरतेची लूट, एवढेच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश या सर्व गोष्टी वरील विधानांची व गुणांची प्रचिती देतात.
विशेष लेख : शिवाजी महाराज आज असते तर !
शिवरायानी समानतेचे तत्व जोपासले. सैन्यामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना समाविष्ठ करून घेतले. शेतकरी, सामान्य माणूस, कारकून, आदिवासी या सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. सर्व विरोधी सत्तांना पाणी पाजणारे सैन्य महाराजांनी निर्माण केले. ही मोठी गोष्ट याठिकाणी नमूद कराविशी वाटते. शेकडो सेनाधूरधरांना शिवरायांनी प्रशिक्षित केल्यामुळे राजाच्या निधनानंतर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मराठ्यांचे स्वातंत्र या लोकांनी जगाच्या पाठीवरील सर्व बलाढ्य अशा साम्राज्यसत्तेशी संघर्ष करून सुरक्षित ठेवले.
शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेचा असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी, आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले. संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत असे. शहाजी राजाची सुटका, मोऱ्यांचे उच्चाटन, अफजलखानाचा पराभव, स्वतःची पन्हाळ्याहून सुटका, विशाल गडावरच्या चकवा, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या. या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते.
विशेष लेख : प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज
विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रुपात पाहत होती. म्हणूनच अमात्याने म्हटले त्याप्रमाणे ‘महाराजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली. शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली. न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली. सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते.
✍️ विशाल आडे
मु. तोटंबा, ता. किनवट, जि. नांदेड.