Saturday, December 2, 2023
Homeविशेष लेखविशेष लेख: पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या कविता मानव जातीच्या कल्याणासाठीच !

विशेष लेख: पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या कविता मानव जातीच्या कल्याणासाठीच !

लेखक-पुरुषोत्तम सदाफुले-गुणवंत कामगार,अध्यक्ष
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद,पुणे


माणूसपणाची पाळंमुळं शेवटपर्यंत घट्ट पकडून ठेवत स्वतःचे मार्केटिंग ज्यांनी कधीच केले नाही असे ‘महाकवी कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे ‘ म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ. रस्त्यावर टाकलेल्या व गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने सांभाळलेल्या सुर्वे मास्तरांच्या रुपाने, महाराष्ट्राला एक कवी मिळाला.

खरं म्हणजे माणूस कुठल्या घरात जन्माला येतो त्यापेक्षा त्याचे कर्तुत्व काय आहे हे महत्वाचे. कधीकधी नाती जुळायला काही प्रसंग घडत जातात आणि त्यातूनच जीवनाचे धागेदारे नकळत जुळत जातात. अशाच धाग्यानं नारायण सुर्वे आणि कृष्णामाई सुर्वे यांच्या आयुष्याची गुंफण झाली. आई-वडील, जात,धर्म,पंथ, गणगोत,सगेसोयरे नाहीत अशा सुर्वे मास्तरांशी लग्न करताना कृष्णामाईंना खूप संघर्ष करावा लागला ; पण कृष्णामाईंनी सुर्वेसरांचा हात धरला तो आयुष्यभर नाही सोडला.उलट मास्तरांना साथ देत यशस्वीपणे संसार केला.

“आईवडील नाहीत म्हणून काय झालं ? माणूसच आहे ना तो ? जाती धर्माचं लेबल त्यांच्याकडं नाही ह्यात त्यांचा काय दोष? असे ठणकावून सांगणाऱ्या कृष्णाबाई कणखर बाण्याच्या असल्याने त्या या समाजबंधनांच्या भिंती ओलांडू शकल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्यावेळी अण्णाभाऊ साठे व शाहीर अमर शेख हे चळवळीच्या बैठका सुर्वे मास्तरांच्या बोगद्याच्या चाळीतील खोलीत घेत असत. सुर्वे मास्तरांनी दुःखाचे कधी भांडवल केलं नाही आणि दुःखाचं गाणंही गायलं नाही.खरंतरं समाजाच्या दुःखाशी नातं सांगणाऱ्यांना शतकांची कुंपणं अडवतं नाहीत.ते येतातच मुळी समाजातला अंधकार,विषमता दूर करण्यासाठी आणि उजळून देतात मनांतले अंधारकोपरे. सुर्वे सरांच्या सानिध्यात असताना मला या त्यांच्यातल्या प्रकाशशलाकेचा अनुभव नेहमीच येत असे. बोगद्याच्या चाळीत काळोख असलेल्या खोलीत,सुर्वे मास्तरांनी कृष्णाबाईंसोबत संसार करता-करता आयुष्यालाही आकार दिला. गिरणीत काम करून पिचलेल्या कष्टकऱ्यांच्या घामाचा वास आणि त्यांचे प्रश्न,जीवनगाणे त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. मी नाही अनेकांतील एकमेव तर आहे सर्वांचा,सर्वांसाठी..असे मानणारे सुर्वे मास्तर आणि त्यांना तितकीच खंबीर साथ देणाऱ्या कृष्णाबाई हे एक अलौकिक जोडपे होते.कविता ही वेदना असते. ती जगावी लागते. अनुभवावी लागते तरच त्यात वेदनेची सखोलता उतरते.ती कविता मग वैयक्तीक न राहता वैश्वीक होते. जीवनातील वेदनांनी,अनुभूतींनी जन्मलेली ही कविता अमर होते. माणसाला आधारासाठी जसा पाठीचा कणा असावा लागतो,तसाच कवितेला विचारांचा,संवेदनांचा कणा असावाच लागतो असे सुर्वे सर नेहमी म्हणायचे. नवोदितांकडे शब्दांचे धन आहे मात्र जीवनाविषयी चिंतन नाही असंही त्यांना वाटायचं. सुर्वे सर हे कामगारांचे,शोषितांचे,श्रमिकांचे आणि पददलितांचे कवी होते. त्यांची खरी बांधिलकी तळागाळातल्या माणसांशी होती. म्हणूनच कुसुमाग्रजांनी त्यांना मानसपुत्र मानले. आधुनिक मराठीत केशवसुत,कुसुमाग्रज,मर्ढेकर,सुर्वे असा अक्ष दाखवता येतो. या चारही जणांत काही गोष्टी समान आहेत. भाकरीच्या चंद्रापासून क्रांतीच्या सूर्यापर्यंत त्यांनी कविता पोहोचवली म्हणूनच सुर्वे सरांना गौरवाने तिसरे केशवसुत म्हंटले जाते..

सुर्वे मास्तरांची कविता मुंबईच्या फुटपाथवर, कापडाच्या गिरणीत,शेताच्या बांधावर आणि एकूणच जगण्याच्या लढाईतून जन्माला आली असली तरी ती कधीच प्रदेशाची आणि विशिष्ठ काळासाठी म्हणून वावरली नाही. भाषा बदलली,प्रदेश बदलला तरी माणंस सारखीच असतात. त्यांच्या वेदनेचे हुंदकेही सारखेच असतात. त्यांनी माणसातच देव पाहिला होता. माणसासारखा पवित्र शब्द जगाच्या शब्दकोषात दुसरा नाही यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. माणसावर प्रचंड श्रद्धा असलेल्या अशा सुर्वे सरांच्या कविता,विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

आपल्या वाट्याला आलेल्या काळोखाचं सुर्वे मास्तरांनी कधी भांडवल केलं नाही. अंधाराच्या जागी उजेडाचं बीज कसं पेरायचं? याचाच विचार ते करीत राहिले.ते जसे जगले तसेच ते कवितेत अवतरले. कविता आणि स्वतःशी त्यांनी कधीही बेईमानी केली नाही. माणसाने जगायचं कसं याचं तत्वज्ञान त्यांच्या कवितेतून दिसतं.

“कामगार आहे मी तळपती तलवार आहे,
सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा घडणार आहे..

या सुर्वे मास्तरांच्या कवितेतील ओळी त्या काळात अनेकांना धक्कादायक वाटल्या तरी त्यातील वास्तव नजरेआड करता येणार नाही.

कविते ऐवजी रद्दी विकली असती तर
बरे झाले असते..
निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी
चुकविता आले असते !

अशा शब्दांत भांडवली व्यवस्थेचे उपरोधी चित्र त्यांनी कवितेतून रेखाटले..

रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे
ह्या उघड्या नागड्या वास्तवात
जगायला हवे, आपलेसे करायलाच हवे,
कधी दोन घेत, कधी दोन देत..

उघड्या नागड्या वास्तवात जगण्याची जिद्द त्यांनी कधी सोडली नाही. म्हणूनच त्यांची कविताही उभ्या विश्वात झडून जात असलेल्या, खचत-पिचत असलेल्या श्रमणाऱ्यांच्या श्रमनिष्ठांची जिवंत कहाणी आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरदार झाली असली तरी दुःख पेलावे कसे, झेलावे कसे, पुन्हा जगावे कसे , ताठ मानेने चालावे कसे हे त्यांची कविता शिकवून जाते. नारायण सुर्वे यांची नाळ कष्टकऱ्यांशी जोडलेली आहे म्हणूनच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात की,नाळ तुटली तरी नाते तुटत नाही. त्याचे ( सुर्वे मास्तर ) जीवन हेच एक काव्य आहे, महाकाव्यही आहे. त्याचे म्हणून एक स्वतंत्र विद्यापिठ आहे. ज्या जीवनाच्या पाठशाळेत ते शिकले त्या पाठशाळेचेच पुढे विद्यापिठ झाले..

सुर्वे मास्तरांनी आपल्या कवितेतून स्त्रीजाणिवांवरही उदात्त विचार मांडला. ‘माझ्या मृत्यूनंतर खुशाल दुसरे घर कर.’ असा विचार त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी मांडला होता. संत कबीरांविषयी मास्तरांना प्रचंड आकर्षण होते. आपल्या भाषणात त्यांनी कबीराचे नाव घेतले नाही असे अपवादानेच घडायचे. मध्यप्रदेशमध्ये मानाचा समजला जाणारा कबीर पुरस्कार त्यांना मिळाला तेव्हा ते म्हणाले , ” कर्तबगारीने कबीर माझ्यापेक्षा हजार पटीने मोठा आहे ; पण जीवनाच्या बाबतीत आमच्यात बरेच साम्य आहे. कबीराला त्याच्या आईने नदीकाठी सोडला आणि मला माझ्या आईने समुद्र घेऊन जगणाऱ्या मुंबईच्या फुटपाथवर..कबीराला सांभाळणारा विणकर होता,मला सांभाळणाराही कापडाशी संबंधीत असलेला गिरणी कामगार होता. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला लागलो. त्यालाही त्याची जात सांगता आली नाही आणि मलाही..”

कोणत्याही कवीचे कामगार,दलित अथवा कोणतेही वर्गीकरण करता येणार नाही. कवी हा अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी त्याची कविता साकारत असतो. कवी हा समग्र मनाचा वेध घेणारा असतो असे सुर्वे मास्तर नेहमी सांगायचे.कामगार ही जगातील सर्वात उच्च जात असून तो सर्वांचा दाता आहे. कामगारांचे अंतर्मन सतत धुमसणाऱ्या ज्वालामुखीसारखे असते, कारण त्याचे भावविश्व हे जगण्यातील अनुभुतीतूनच प्रतिबिंबीत होत असते. कविवर्य नारायण सुर्वे म्हणजे साक्षात कामगार वस्ती आणि कामगारांचा नारायण. जवळ जवळ सहा दशके कामगार कवितेचा ध्रुवतारा प्रकाशमान होता. त्यांचा मूर्तिमंत साधेपणा आणि विचारांचे तेज इतके प्रखर होते की, त्यांच्या साध्या सरळ शब्दांनाही तलवारीची धार होती. प्रस्थापितांच्या समृद्ध दालनात हा साधा शिपाई शिरला कधी आणि त्या प्रांताचा शिक्षक होऊन बसला कधी,हे भल्याभल्यांना उमगेपर्यंत या पाईकाचे रुपांतर विद्यापिठात झालेले होते.

कामगारांच्या व्यथा प्रत्यक्षात ऐकून घेण्यासाठी आणि त्यांनी लिहिलेल्या कथा-कविता ऐकण्यासाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत सुर्वे मास्तर नेहमी येत असत. घट्टे पडलेल्या कष्टकऱ्यांच्या हातून त्यांच भावविश्व कागदावर उमटलं पाहिजे..हे साहित्य समाजाभिमुख झालं पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता.त्यासाठी,१९९१ साली त्यांनी पिंपरी-चिंचवड मधे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेची स्थापना केली. अर्थातच त्यामुळे कामगारांना हक्काचे व्यासपीठ तयार झाले. १९९२ साली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने पहिले कामगार साहित्य संमेलन भरविण्यात परिषदेला यश आले. या पहिल्याच संमेलनाचे अध्यक्षपद अर्थातच मास्तरांकडे आले. हे पहिले संमेलन पुण्यातच झाले.त्यानंतर राज्यात विविध १६ ठिकाणी ही संमेलने संपन्न झाली.स्वतःचे हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने अनेक कामगारच नाहीत तर त्यांचे कुटूंबियही लिहिते झाले याचा आनंद अमुल्य आहे. आज अनेक कामगार साहित्याच्या विविध प्रांतात आपल्या लेखणीचा ठसा उमटवत आहेत. या कामगार साहित्य परिषदेची धुरा नारायण सुर्वे सर गेल्यानंतर माझ्याकडे आणि कवी उद्धव कानडे यांच्याकडे आली आहे.

पहिल्या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मास्तर म्हणाले होते की ,इतिहास कूस बदलतो आहे! खरं म्हणजे श्रमिकांच्या या व्यक्त होण्यातूनच अनेक कामगार लेखक,कवी,कथाकार झाले आहेत आणि होत आहेत.राबणारे हात कपाळावरून वाहणाऱ्या थेंबांचे अनुभव स्वतः लिहू लागल्यामुळे कामगार साहित्याला झळाळी आली आहे. हे बदल घडविण्यात कामगार साहित्य परिषदेचं योगदान फार महत्वपूर्ण ठरलं आहे.

कामगार,मालक,कामगार नेते,श्रम मंत्रालयातील अधिकारी यांना एका व्यासपीठावर आणून श्रम-उद्योग परिषदेचं आयोजन केलं जातं. दुभंगलेलं कामगार जीवन पुन्हा जोडण्यासाठी हा उपक्रम फारच स्तुत्य आहे. गरीब,श्रीमंत,उच्च,निच ही भेदाची दरी बुजवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. अर्थातच यामुळे मालक व कामगार यांच्या समन्वयातून एक नवी औद्योगिक क्रांती आणि संस्कृती पिंपरी-चिंचवड या उद्योग नगरीत निर्माण झाली आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या प्रेरणेतून,संस्कारातून इथला कामगार समृद्धतेकडे वाटचाल करू लागला आहे. असे झाले तर एक दिवस कामगार साहित्याचा हा ज्ञान वृक्ष बहरेल,विस्तारेल आपल्या हजारो शाखांनी ज्ञानदान करेल,समाजाला नवी दृष्टी देईल यात शंका नाही..

संबंधित लेख

 


लोकप्रिय