Friday, March 29, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नेमकं कोणासाठी?

विशेष लेख : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नेमकं कोणासाठी?

इंग्रजांच्या जुलमी राज्यव्यवस्थे पासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या दिवसाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारने 12 मार्च 2021 पासून पुढील 75 आठवड्यांमध्ये अर्थातच 15 ऑगस्ट 2023 पर्यंत केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक राज्यातील सर्वसामान्य जनतेला सामावून घेऊन संपूर्ण भारतभर अत्यंत हर्ष, उल्हासामध्ये व आनंदाने हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. मागील 75 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताने शून्यातून विश्व निर्माण केला आणि जगाच्या नकाशावरती भविष्यातील एक महासत्ता म्हणून आपले आस्तित्व निर्माण करू पाहत आहे.

2014 साली “सबका साथ, सबका विकास” हा अजेंडा घेऊन भारतीय जनता पार्टी कधी नव्हे इतक्या बहुमताने सत्तेत आली; ती लोकांनी दाखवलेल्या विश्वासावर व विकासाच्या गुजरात मॉडेलवर. त्यातच भर होती काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराच्या कमकुवत बाजूची. इ. अनेक कारणांमुळे भाजप सत्तेत आली. मात्र त्यांनी दिलेल्या एकूण आश्वासनापैकी धार्मिक आश्वासने पूर्ण झालेले असतीलही, परंतु सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी जे प्रश्न उद्भवतात त्या आश्वासनांचे व घोषणेची काय झाले? आज भारतातील सर्व सामान्य जनतेला एक वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली आहे; तर दुसरीकडे आपले सरकार कार्पोरेटर्सचे अर्थात भांडवलदारांचे दरवर्षी करोडो रुपयांचे कर्ज माफ करत आहे. आणि गरीब जनतेला शासकीय योजनेतून मिळणाऱ्या थोड्याफार अनुदान, लाभांना आपल्या देशाचे पंतप्रधान “रेवडी” म्हणून संबोधतात. देशामध्ये कधी नव्हे इतकी महागाई दिवसें-दिवस वाढत चाललेली आहे. त्यातच पुन्हा दुधापासून तर महागड्या वस्तूंवर सतत वाढत चाललेली ‘जीएसटी’ चा भार आहेच. एवढेच नव्हे तर भारत देश हा जगातील एकमेव असा देश आहे की, ज्या देशांमध्ये शैक्षणिक साहित्यावर जीएसटी लावण्यात आलेली आहे. अर्थात आजच्या परिस्थितीत विचार केला तर शिक्षण आपण भांडवलदारांकडून विकत घेत आहोत. कोणत्याही देशाचा विकास हा त्याच्या देशातील शैक्षणिक बाबीवर देखील आधारित असतो. या देशातील शिक्षण व्यवस्थेवर भांडवलदारांचे वर्चस्व निर्माण होत आहे; तर दुसरीकडे शासकीय शिक्षण संस्था बंद पडत आहेत किंबहुना त्या बंद पाडल्या जात आहेत. याला सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढेच या देशातील नागरीक देखील जबाबदार व कारणीभूत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये “हर घर तिरंगा” ही मोहीम राबवली जात आहे. ज्या भाजपने आपल्या संघ कार्यालयावर 2014 पर्यंत स्वातंत्र्यदिनी भारताचा तिरंगा फडकवला नाही, तोच भाजप आज अमृत महोत्सवी दिनानिमित्त हर घर तिरंगा लावायला सांगतोय. भारतीय स्वातंत्र्यात ज्यांचा कोणताही योगदान नाही आज ते स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे गुणगान गाताना दिसतात. ठीक आहे प्रत्येक भारतीय लोक ‘तिरंगा’ आपल्या घरावरती लावेल; कारण, तेवढं प्रेम संपूर्ण भारतीयांचा या तिरंगा वरती आहे. पण, प्रश्न पडतो की ज्या लोकांना आहेच त्यात तिळ माञ शंका नाही. पण प्रश्न पडतो की, त्यांना राहायला घर नाही जे उघड्यावर, रस्त्यावर, नाल्याच्या कडेला, सिग्नल वरती झोपतात किंवा राहतात त्या लोकांनी झेंडा कुठे लावायचा? अशा लोकांची भारतामध्ये खूप मोठी संख्या आहे. याला भारतातील आदिवासी समाज, भटका-विमुक्त समाज, दलीत समाज देखील अपवाद नाही. किंबहुना आज घडीस भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती आसलैल्या द्रौपदी मुरमू यांच्या मतदारसंघातील असे अनेक आदिवासी लोक आहेत की, ज्यांना राहायला घरी नाहीत. ते गवताच्या झोपडीत आज देखील राहतात.

भारत 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला तो फक्त राजकीय दृष्टिकोनातून. तो सामाजिक व आर्थिक दृष्टीने कधीच स्वातंत्र्य झाला नाही. याचे कारण असे की, स्वातंत्र्यापासून ते आज पर्यंत भारतामध्ये जी कट्टर धार्मिकतेची तेढ निर्माण केली जात आहे. जात-धर्मामध्ये, गटा-तटांमध्ये विभागला जात आहे. उच्च-नीचतेचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे. दलित, बहुजनांवर होत असलेले वारंवारचे हल्ले इ. अनेक कारण आहेत की ज्यामुळे माझा भारतीय नागरिक सामाजिक दृष्टिकोनातून तो आजही स्वातंत्र झालेला नाही. तो सामाजिक बंदीवासात किंवा त्याला आपण सामाजिक गुलामगिरी चा जीवन जगत आहे आसे म्हणटले तरी वावगे ठरणार नाही. मग हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव नेमकं कोणासाठी?

माझ्या भारतीय समाजात आज आर्थिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विषमता जाणवते. भांडवलदार वर्ग दिवसें-दिवस श्रीमंत होत चाललेला आहे आणि सर्वसामान्य नागरिक मात्र बिहाल होतोय, याकडे माझं सरकार केव्हा लक्ष देणार. गोर-गरीब जनतेने एखाद्या बँकेकडून कर्ज स्वरूपात थोडीफार रक्कम घेतली आणि ती जर का त्यांच्याकडून फेडता आली नाही तर त्याचे घर आणि शेतीची नीलामी केली जाते. सोबतच त्याची सामाजिक प्रतिष्ठा देखील नीलामीमध्ये काढली जाते. त्याच जागेवर एखादा भांडवलदार निरव मोदी, मेहुल चौक्शी किंवा विजय मल्ल्या सारख्या आनेक जण असतात त्याच्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. उलट त्यांचे हजारो कोटींचे कर्ज दिवाळखोरीत दाखवून दरवर्षी माफ केले जातात. याचा अर्थ गोर-गरीब, सर्वसामान्यांना सामाजिक व आर्थिक समता प्राप्त झाली आहे का? मग सांगा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष नेमकं कोणासाठी?

2021 च्या जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारत देशाचा 116 देशांच्या यादीमध्ये 101 व्या क्रमांकावर आहे. त्यापूर्वीचा भारताचा 116 देशांमध्य 94 वा क्रमांक होता. याचा अर्थ असा आहे की, भारत देशासमोर भुकेची गंभीर समस्या ही दिवसें-दिवस वाढत चाललेली आहे. आपल्या शेजारी गरीब देश म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो; ते पाकिस्तान 92 व्या क्रमांकावर, बांगलादेश 76, नेपाळ 76 व म्यानमार 71. म्हणजेच भारतापेक्षा वरील देशाच्या भूक स्थिती उत्तम असल्याचे स्पष्ट होते; याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. मात्र आपले राजकारणी आपणाला या गोष्टी समोर येऊ देत नाही, समोर आणतात ते धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे आणि एकमेकांमध्ये भांडण लावणे. हाच धंदा राजकारणी लोक चालवत असतात.

आज दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या प्रचंड वाढत चाललेली आहे, त्याशिवाय बेरोजगारांनी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, नोटबंदीमुळे सर्वसामान्यांवर झालेला परिणाम देखील आजपर्यंत आपण भोगत आहोत. सतत वाढत चाललेली ‘जीएसटी’, भ्रष्टाचार, शासकीय सेवेतील नोकर भरती बंद आहे किंवा होत नाही, खाजगीकरणास आलेला पेव, नफ्यात असणारे शासकीय उद्योगधंदे, रेल्वे, विमानसेवा व इतर उद्योगाचे खाजगीकरण करणे नेमकं कोणासाठी? चालले अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या सुजाण नागरिकांना शासनाकडून अपेक्षित असताना; शासन धार्मिकतेचा देश अभिमानाचा डोस देऊन, लोकांना जीवन-मरण्याच्या प्रश्नावरून भरकटवताना दिसते. अशा स्वतंत्र्याबद्दल म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हा अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की, “ए आजादी झुठी है, देश की जनता भुखी है”! हे उद्गार आज ही स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देखील तंतोतंत लागु होते. म्हणून हा स्वतंत्र अमृतमहोत्सव नेमकं कोणासाठी?

शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी, दलितांसाठी, बहुजनांसाठी, आदिवासींसाठी, भटक्या-विमुक्तांसाठी की भांडवलदारांसाठी? नेमकं कोणासाठी? हा अमृतमहोत्सव नेमकं कोणासाठी?

– बळीराम शेषेराव चव्हाण (पीएच.डी)
उस्मानाबाद.
9028446942

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय