Thursday, April 25, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : त्याग आणि बलिदानाचा उत्सव

विशेष लेख : त्याग आणि बलिदानाचा उत्सव

माणसाच्या जगण्याचा खरा आधार कोणता? असा प्रश्न विचारला तर कोणीही म्हणेल ‘प्रेम’ होय. निर्मिकाचे विश्व, सृष्टी, आपली मातृभूमी, आपला देश, देश बांधव, आपली संस्कृती याविषयी प्रेम, आत्मीयता, आस्था, जिव्हाळा व सौहार्द हेच जीवनाचे, जगण्याचे गमक आहे. माणसाने सन्मान, शांती, सुरक्षितता आणि विकास, समृद्धी व सुधारणांच्या संधी व हक्कासह जीवन जगावे हाच जीवनाचा उद्देश असावा. मानव आणि समाजाचे कल्याण व उद्धार हे अंतिम ध्येय असावे. मानवतेचा जागर व्हावा. मानवी जीवनमूल्ये व नीतीमूल्यांचा गौरव व्हावा. यातच आपले हित व सौख्य सामावलेले आहे. परंतु माणसाचा अमर्याद स्वार्थ, हव्यास आणि ओरबाडून जगणे हे मानवी जीवन व विश्वकल्याणाचे वाटेत निश्चित अडथळा ठरू शकते. अशावेळी निर्मिक व मानवी जीवन यांचे प्रती त्याग, बलिदान, सेवा, समर्पण या गोष्टी मात्र गौरवाच्या ठरतात. खरे प्रेम व जीवन हे त्यागातच दडले आहे.

अशाच गौरवाचा, उत्सवाचा क्षण म्हणजे ‘ईद उल अद्हा’ (त्याग व बलिदानाची ईद) होय. निर्मिक व त्याची निर्मिती याप्रती प्रेम, भक्ती व कृतज्ञता व्यक्त करत असताना त्याग, बलिदान, सेवा, समर्पणाचा संकल्प वचन व इरादा व्यक्त करणे व यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे हाच उद्देश बकरी ईदच्या निमित्ताने असतो.

मानवी जीवनाच्या हजारो वर्षांच्या या वाटचालीमध्ये परमेश्वर व त्याची निर्मिती आणि मानवतेसाठी आजपर्यंत अनेक प्रेषितांनी आपल्या जीवनाचे सर्वस्व अर्पण केले. त्याग व बलिदानाची अत्यंतिक सीमा गाठली. यामध्ये हजरत महंमद (स.) पैगंबर यांच्या जीवनापूर्वी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचे एक प्रेषित हजरत इब्राहिम (अ.) व त्यांचे अत्यंत प्रिय पुत्र हजरत इस्माईल (अ.) यांचे जीवन ठळकपणे आपल्यासमोर येते. हजरत इब्राहिम (अ.) यांनी एक परमेश्वर व मानवतेच्या प्रतिष्ठापनेसाठी आपले अत्यंत प्रिय पुत्र यांच्या बलिदानाची व हजरत इस्माईल (अ.) यांनीही आपल्या वडिलांच्या आदेशार्थ पराकाष्ठेचा इरादा केला. याच उद्देशासाठी आजपर्यंत अनेक प्रेषितांनी त्याग, बलिदानासह प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. तसेच पैगंबरांचे सोबती (सहाबा), वली-औलीया (सूफी संत- महात्मे), विद्वान या सर्वांनी इस्लामच्या प्रतिष्ठापणेसाठीच आपले कार्य केले आहे. या सर्वांच्या कार्याचा गौरव व आठवण म्हणूनच हा त्याग, बलिदान व समर्पणाचा उत्सव ‘ईद उल अद्हा’ म्हणून साजरी केली जाते.

हजरत मुहम्मद (स.) पैगंबर यांनीही आपले सर्वस्व जीवन इस्लामच्या प्रतिष्ठापनेसाठी समर्पित केले. भक्ती, अध्यात्म व दुनियावी जीवन यांचा योग्य ताळमेळ पैगंबरांनी घालून दिला. एक ईश्वराची भक्ती व अध्यात्म या माध्यमातून परमेश्वराचा मार्ग दाखवला. परंतु हा परमेश्वराचा मार्ग निव्वळ भक्ती व अध्यात्मात लीन होणारा नाही. परमेश्वराच्या भक्तीमध्ये शुद्ध बुद्ध व भान हरपून आणि भौतिक, सांसारीक गोष्टींचा त्याग व विरक्तीचा नाही. मग परमेश्वराचा मार्ग कोणता आहे? खरं तर हा भक्तिमार्ग भौतिक, संसारिक जीवनातूनच समाजाच्या कल्याण, चांगले व भल्यासाठी जातो. यासाठी मात्र त्याग, समर्पण व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे बंधन आपल्यावर आहे.

इस्लामने सांगितलेली नैतिक व जीवनमूल्ये अंगीकारण्यासाठी आणि अनिवार्य कर्तव्य बजावण्यासाठी झोकून देऊन या मार्गात समर्पण व पराकाष्टा करणे गरजेचे आहे. इस्लामचे आचरण आपणास भौतिक, सांसारीक मार्गातूनच परमेश्वराच्या (अल्लाह) मार्गावर नेते. म्हणजे परमेश्वराला राजी करणेस निव्वळ त्याची भक्ती व अध्यात्म पुरेसे नाही तर यासाठी कर्तव्य कठोर भौतिक, संसारीक गोष्टी पार पाडणे आवश्यक आहे. इस्लामची अनिवार्य कर्तव्य पार पाडण्यासाठी तुमचे कर्म अत्यंतिक त्याग, समर्पण व प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे असले पाहिजे.

सर्वात मोठा त्याग म्हणजे स्वतःचा अहंकार, स्वार्थ व अप्पलपोटेपणा यांचा त्याग करा. समाजात आधुनिकता व सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करा. सांप्रत काळच्या सामाजिक समस्या व अडचणी सोडवण्यासाठी संघर्षाची व त्यासाठी पराकाष्टा व त्यागाची तयारी ठेवा. गरीब, गरजवंत व सामान्यांच्या अडचणी व प्रश्नांसाठी त्यागाची तयारी ठेवा. जगात ज्ञान प्राप्त करण्यासाठी सर्व दूर पोहोचा व त्यासाठी पराकाष्ठा करा. दीनदुबळे, वंचित व पिडीतांची सेवा करा. निराधारांना आधार द्या. त्यांना मदतीचा हात द्या. त्यासाठी पराकाष्टा करा. अन्याय, अत्याचार, शोषण व पिळवणूक सहन करू नका. त्याचे विरुद्ध लढाईला तयार रहा. स्वतःचा चरितार्थ कष्ट व प्रामाणिकपणे चालवा आणि इतरांना आर्थिक मदतीचा हात द्या. अराजक माजवू नका. अशा अराजकाच्या विरुद्धही दोन हात करण्याची तयारी ठेवा. आजारी, वृध्द व माता पिता यांची सेवा करा. मानव व समाज यांचे सर्वांगीण कल्याण व भल्यासाठी आणि मानवतेसाठी आपल्याकडे असलेल्या साधनसुविधेसह यथाशक्ती प्रयत्न करा. यासाठी त्याग, सेवा, समर्पण व प्रयत्नांची पराकाष्ठा करा. हे सर्व मार्ग व प्रयत्न निश्चितच परमेश्वराकडे घेवून जातील. हाच मार्ग परमेश्वराचा आहे. यातूनच परमेश्वर राजी खुशी होईल. हाच संदेश व शिकवण सामान्य माणसांत रुजावी या उद्देशाने ‘ईद उल अद्हा’ सारखा त्यागाचा उत्सव साजरा करण्यात येतो.

  • शफीक देसाई
    संपर्क – 9421203632
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय