अकोले (अहमदनगर) : अकोले शहरात सरकारच्या वतीने पंचवीस बेडचे कोरोना हॉस्पिटल सुरू होत आहे. ऑक्सिजनसह अत्यावश्यक सुविधा असलेल्या या हॉस्पिटलसाठी लागणारी विविध साधन सामुग्री सामाजिक योगदानातून उभी करावी लागणार आहे. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन सहकार क्षेत्राने व सामाजिक संघटनांनी या सामाजिक कामासाठी पुढे यावे असे आवाहन केले होते. विविध संस्था व सामाजिक संघटनांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था अकोले या संस्थेने तातडीने हॉस्पिटलला लागणारे टेबल, खुर्च्या, स्टूल, रॅकसह फर्निचर उपलब्ध करुन दिले. पतसंस्थेच्या चेअरमन ऍड. मंगला हांडे, संचालक शोभा गवांदे, मॅनेजर रंजना झोळेकर यांनी याकामी पुढाकार घेऊन हे साहित्य हॉस्पिटलसाठी उपलब्ध करून दिले.
इस्लाम पेठ येथील हरिश्चंद्र हॉस्पिटल येथे डॉ.अजित नवले, विनय सावंत, डॉ. भांडकोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभीरे, ऍड. ज्ञानेश्वर काकड यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला पतसंस्थेच्या चेअरमन ऍड. मंगला हांडे, संचालक शोभा गावंदे व मॅनेजर रंजना झोळेकर यांनी हे साहित्य हॉस्पिटल प्रशासनाकडे सुफुर्त केले.
सहकारी संस्थांच्या वतीने वस्तूंच्या स्वरूपात सामाजिक योगदान उभे करण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर व सामाजिक कार्यकर्ते महेश नवले प्रयत्न करत आहेत. लवकरच कोरोना काळात जीवाची बाजी लावणाऱ्या ग्रामीण कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत सामाजिक योगदानातून या कर्मचाऱ्यांना सहाय्यता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.