(लग्न सोहळ्या प्रसंगी प्रार्थना फाऊंडेशनला मदत सुपूर्द करताना डावीकडून महिबूब शेख, पै.अस्लम काझी, प्रसाद मोहिते, अफसर काझी, मतीन शेख) |
सुर्डीच्या मतीन शेख यांनी दिला वेगळा संदेश
वैराग : लग्न म्हणलं की नवरदेवासाठी बॅण्ड बाजा, वरातीला घोडा, भव्य मंडप असा बराच खर्चिक समारंभ करणाऱ्यांची कमी नाही. पण या सर्व हौसेला टाळत सुर्डी ता.बार्शी येथील मतीन शेख यांनी समाजभान जपत सोलापूर येथील प्रार्थना फाऊंडेशनच्या बालग्राम व वृद्धाश्रम उभारणीसाठी आर्थिक मदत तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
वैराग येथे मतीन शेख व फिरदोस सय्यद यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. मतीन हे कोल्हापुरात पत्रकारिता करत आहेत. बालदिनाचे औचित्य साधत पत्रकारितेच्या मानधनातून बचत केलेली ११,१११ रुपये रक्कम वंचितांसाठी सामाजिक चळवळ चालवणारे प्रसाद मोहिते यांना देण्यात आली. ते वंचित, अनाथ मुलांचा संभाळ करत आहेत. या कामासाठी त्यांनी स्वतःची पाच एकर जमीन देखील विकली. पत्नी अनु यांना सोबत घेत त्यांनी भिक मागणाऱ्या, रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना आसरा देत शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, मायेची उब दिली. निराधार वृद्धांचा संभाळ करत आहेत. सध्या प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम उभारणीचे काम सुरु आहे. निम्म्यापर्यंत बांधकाम आले आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या विटा, सिमेंटच्या खर्चासाठी ही मदत शेख यांच्या कडून सुपुर्द करण्यात आली.
लग्न पत्रिका ही झाली होती व्हायरल…
मतीन शेख यांच्या लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिका पारंपारिक लग्न पत्रिकेला छेद हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतिक व माणुसकीची शिकवण देणारी होती. मराठी भाषेतील पत्रिकेवर बुद्ध, तुकोबा, शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांसारख्या महामानवांच्या प्रतिमेसह विशेष संदेश देण्यात आला होता. आदर्श लग्न पत्रिका म्हणून सोशल मीडिया व्हायरल झाली होती.
समाजातील वंचित घटकाचे आपण काही तरी देणे लागतो आणि त्यासाठी आपण काही तरी विधायक कृती करुन, निरर्थक गोष्टी मागे सोडत वेगळा पायंडा पाडत मतीन शेख यांनी सामाजिक संदेश दिला. यावेळी कुस्ती सम्राट पै.अस्लम काझी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अफसर काझी, महिबूब शेख व पाहूणे उपस्थित होते.