मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा या सातत्याने होत असतात. काही दिवसांपुर्वी अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाल्याने चर्चेला उधान आले होते. नंतर आपली तब्येत ठिक नसल्याने आपण आराम करत होतो, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं होतं.
या घटनेला आठवडाही झाला नसताना आता पुन्हा येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या सर्व राजकीय घडामोडींदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.’ या ट्वीटनंतर चर्चांना उधाण आलं आहे.