मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून मुंबई हायजवळ P305 बार्ज आणि वरप्रदा बुडून ८६ कर्मचारी प्राणास मुकले. त्यामुळे ओएनजीसी आणि अॅफकॉन्स कंपनी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपये नुकसान भरपाई आणि दरमहा वेतन देण्यात यावे, अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन् ट्रेड युनियनने केली आहे.
सिटूच्या शिष्टमंडळाने ओएनजीसीच्या मुंबई वांद्रे येथील मुख्यकार्यालयाला भेट दिली. त्यावेळी कामगार कर्मचारी यांना योग्य ती भरपाई देण्यात येईल असे आश्वासन ओएनजीसी कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी दिले, अशी माहिती राष्ट्रीय कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.
काल मुंबईत प्रचंड पाऊस आणि वादळामुळे संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. मुंबई पाण्यात गेली होती. ट्रेन आणि संपूर्ण वाहतूक बंद पडली असतानाही समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्या कामगार कर्मचारी यांना त्यांचा अधिकार मिळावा म्हणून सेंटर ऑफ इंडियन् ट्रेड युनियन आणि एफएसयुआय कामगार संघटनांनी बुधवारी वांद्रे येथील ओएनजीसीच्या मुख्य कार्यालयावर प्रचंड पावसात निदर्शने केली. या आंदोलनाचे नेत्तृत्व सेंटर ऑफ इंडियन् ट्रेड युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल. कराड, विवेक मोन्तेरो, कॉ.मनोज यादव, सईद अहमद, के. नारायणन यांनी केले.
ओएनजीसी कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकारी पांडे यांच्या सोबत कामगार कर्मचारी यांच्या कुटुंबाना भरपाई देण्यात यावी या अन्य मागण्यांबाबत तासभर चर्चा केली असे राष्ट्रीय कामगार नेते डॉ. कराड यांनी सांगितले.
ओएनजीसी आणि अॅफकॉन्स कंपनी यानी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कामगारांच्या सुरक्षेविषयी पुरेशी काळजी घेतली नाही व दुर्लक्ष केल्याने एवढा मोठा अपघात घडला असून ८६ कर्मचारी मृत्यू पावले आहेत. त्यामध्ये बहुतांशी कामगार हे कंत्राटी कामगार आहेत. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी करावी, या अपघाताला आणि प्राणहानीला कोण जबाबदार आहे याची निश्चिती करावी, यापुढे असे अपघात होणार नाही यासाठी निर्णय करावेत, प्रथम दर्शनी दोषी दिसून आलेल्या ओएनजीसी आणि अॅफकॉन्स कंपनी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, मृतांच्या कुटुंबाना दर महिना वेतन द्यावे तसेच एक कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून कुटुंबाना द्यावे अशी मागणी ओएनजीसी कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही डॉ. कराड यांनी दिला आहे.
सीआयटीयु, महाराष्ट्र, मुंबई कमिटीचे प्रमुख नेते नारायणन, हेमकांत सामंत आरमायटी इराणी, जगनारायण कहार, सुशील देवकर, देविदास आडोळे, संतोष काकडे तसेच अन्य नेते, कार्यकर्ते आणि मृत्यू पावलेल्या कुटुंबांतील व्यक्ती या आंदोलनात सहभागी झाले होते.