पुणे : सध्या सोशल मीडियामुळे लग्न सोहळ्यातील रूढी परंपरा काहीशा बदलताना दिसत आहे. कुणी लग्न मंडपात शानदार एन्ट्री करत तर कुणी बुलेटवर, ट्रॅक्टरवर, बैलगाडीत तर कुणी नाचत लग्नमंडपात एन्ट्री करत, त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. पुण्यात असाच नवीन प्रकार घडला आहे, नवरी चक्क गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास करतानाचा प्रकार समोर आला आहे, मात्र हा प्रवास नवरीला चांगलाच महागात पडला आहे.
भोसरी परिसरातील एक नवरी मुलीने चक्क स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून धोकादायकरितीने दिवे घाटातून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला आहे. कोरोना महामारीमुळे लग्न सोहळ्यासाठी राज्य सरकारने विशिष्ट नियमावली जाहीर केली असताना गाडीच्या बोनेटवर बसून धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी करत नवरी मुलगी मंगल कार्यालयाकडे प्रवास करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवरी मुलीवर पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या नवरी मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.