Thursday, April 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएक महिन्यापासून राज्यात अवघ्या एका व्यक्तीचे मंत्रीमंडळ - अजित पवारांची बोचरी टीका

एक महिन्यापासून राज्यात अवघ्या एका व्यक्तीचे मंत्रीमंडळ – अजित पवारांची बोचरी टीका

पिंपरी चिंचवड : “राज्यात चांगले चालत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आणि महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार चांगले चालले होते. अडीच वर्षात सरकारने कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ठ काम केले होते. आज महिना झाला आहे. दिल्लीचा सिग्नल मिळत नसेल म्हणून नव्या सरकारला मंत्रिमंडळ स्थापन करता येत नाही. मंत्रीमंडळ विस्ताराला काय अडचण आहे ते खुल्या मनाने सांगावे. 40 लोकांना मंत्रीपदाचे गाजर दिल्याने आता देता येत नसल्याने विस्तार रखडला असला तर तसेही सांगावे. राज्याचे प्रशासन टप्प झाले आहे. राज्यात महिनाभर एका व्यक्तीचे मंत्रिमंडळ आहे, दुसरा बिनखात्याचा मंत्री आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासन थंड झाले आहे, अशी परखड टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चिंचवड येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केली. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि सीएनजीचे दर आता सारखेच आहेत, त्यामुळे इंधनखर्चात बचत करण्याचे मध्यमवर्गीयांना आता अशक्य झाले आहे. पेट्रोल महागले म्हणून लोकांनी डिझेलच्या गाड्या घेतल्या. डिझेलही पेट्रोलच्या जवळ गेल्यावर लोकांनी सीएनजीच्या गाड्या घेतल्या. आता सीएनजीचा दरही केंद्रातील भाजपच्या सरकारने पेट्रोल एवढाच केला आहे. सरकार बनवाबनवी का करतं ? का फसवणूक करत आहात. जीएसटीमुळे महागाई वाढविली जातेय. सरकार चालविताना कर लावावा लागतो मान्य आहे. परंतु; गरीबांना कशाला लावता, हे कळले पाहिजे.

वार्डावॉर्डात जाऊन काम करा

आता कार्यकर्त्यांनी वार्डावॉर्डात जनतेच्या बदललेल्या गरजा आणि अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत. बूथ कमिट्या मजबूत करून कामाला लागा असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. महापालिकेत पाच वर्षे भाजपची सत्ता होती. 2017 मध्ये विरोधकांनी विकासकामांपेक्षा बदनामी करून सत्ता मिळवली आहे. जनता सुज्ञ आहे, यांचा कारभार सर्वांनी पाहिला आहे. मात्र, मागील पाच वर्षात भाजपने करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. शहराचा विकास राष्ट्रवादीमुळे झाल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची कामे घरोघरी पोहचवावीत. भविष्य आणि वेळ आपल्याकडेच राहणार आहे. शहरातील अभ्यासू सामाजिक कार्यकर्त्यांचा सल्ला घ्या, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्यास महाआघाडीचे सरकार पडल्यानंतरही कार्यकर्त्यांचे आकर्षण अजित पवार असल्याचे आज दिसले. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह हाऊसफूल्ल झाले होते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, शमिम पठाण, वैशाली काळभोर, राजू मिसाळ, नाना काटे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक जगदिश शेट्टी, समिर मासुळकर, विनोद नढे, अरुण पवार, पंकज भालेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय