आकुर्डी : गावातील मुख्य रस्त्यावर महापालिकेने खूप मोठी खोदाई करून ठेवली आहे. प्राधिकरणाकडून खंडोबामाळ चौकाकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर बॅरिकेड लावले आहेत. आणि प्राधिकरण म्हाळसाकांत चौकाकडून येणारी सर्व वाहने विठ्ठलवाडी मार्गे सी टर्न मारून पुन्हा आकुर्डी मनपा दवाखान्याच्या मेन रोड वरून पुढे जात आहेत.
या रस्त्याचे काम पावसाळ्या आधी पूर्ण होईल असे वाटत नाही. कारण गेले एक वर्षं आकुर्डी भाजी मंडई, विवेकनगर येथील रस्त्याचे काम अर्धवट आहे. येथे स्टॉर्म वॉटर पाईपलाईनचे आणि रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम सुरू आहे. हा रस्ता बंद केल्यामुळे दत्तवाडी, विठ्ठलवाडी, आकुर्डीगाव येथील कामगारांना पोस्ट ऑफिस, बजाज आटो मार्गे निगडी, चाकण, तळेगाव येथे जाता येत नाही. खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाजी मंडई समोरील कामामुळे दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
आकुर्डी हा दाट लोकवस्तीचा प्रभाग आहे. मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मोठी कामे सुरू करण्यापूर्वी प्रभागाचा भूगोल अभ्यासला पाहिजे. आकुर्डीगाव, दत्तवाडी, विठ्ठलवाडीतील जुन्या रस्त्याचे नकाशे स्थापत्य विभागाकडे असतात. इथे मुंबई पुणे महामार्गाला जोडणारे दोनच रस्ते आहेत. त्यापैकी म्हाळसाकांत चौकातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास दीड वर्षे लागली. भाजीमंडई, विवेकनगर येथील काम अद्याप पूर्ण नसताना आकुर्डीत नव्याने खोदाई का केली जात आहे?
डांबरीकरणाचा खर्च 3000 रुपये प्रती चौरस मीटर आणि काँक्रीटीकरणाच्या खर्च 5000 रुपये प्रती चौरस मीटर आहे. या रस्त्याचे आयुष्य जास्त असल्याचा दावा केला जातो, मात्र तसे कोणी अद्याप खात्रीशीर म्हटलेले नाही. सिमेंटच्या दोन ब्लॉकमध्ये एक्सपानशन जॉईंट असतो, आणि दुतर्फा पदपथ असतात ते काम नीट झाले नाही तर सिमेंटचा रस्ता खराब होऊ शकतो. पर्यावरणाच्या दृष्टीने हे रस्ते घातक आहेत. गुणवत्ता पूर्वक काम केल्यास डांबरी रस्ते खराब होत नाहीत, तीस वर्षांपूर्वी पुण्याचा जंगली महाराज डांबरी रस्ता गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. काँक्रीटीकरणामुळे भविष्यातील देखभालीचा खर्च वाढणार आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली टक्केवारी आणि पैशाची उधळपट्टी सुरू आहे असा आरोप माकपचे नेते क्रांतिकुमार कडुलकर यांनी केला आहे.
मात्र हजारो कामगारांची वस्ती असलेल्या या भागात फक्त 28 शौचालये महिला आणि पुरुषांसाठी आहेत. त्यातील एक शौचालय 30 वर्षापूर्वीचे आहे.