Friday, April 19, 2024
Homeजिल्हामिरज, सांगली शहरातील रस्त्यांची चाळण; नागरिक, प्रवासी, रिक्षाचालक हैराण

मिरज, सांगली शहरातील रस्त्यांची चाळण; नागरिक, प्रवासी, रिक्षाचालक हैराण

मिरज / क्रांतिकुमार कडुलकर : मिरज,सांगली शहरातील मुख्य रस्त्यांची महापूर आणि पावसामुळे पूर्णतः दुर्दशा झाली आहे. मिरज,सांगली,कुपवाडा ही पश्चिम महाराष्ट्रातील श्रीमंत महापालिका आहे. या शहरातील रस्ते पिंपरी चिंचवड मनपा सारखे उत्तम दर्जाचे असावेत अशी जनतेची आकांक्षा आहे.

दोन वर्षापूर्वी थाटामाटात येथील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. काही रस्ते चौपदरी करण्यात येतील अशा घोषणा झाल्या, रस्त्याची ऑनलाइन भूमी पूजने झाली. पूर आणि पावसाचे निमित्त दरवर्षी असते. मग अंदाज पत्रकातील पैसा कुठे जातो? असा नागरिकांचा सवाल करत आहेत.

मात्र सुमार दर्जाच्या कामामुळे जून, जुलै 2020 – 21 मध्ये या रस्त्यांची पहिल्या पावसात चाळण झाली आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे रिक्षा व्यवसायिक बेहाल झाले आहेत. सांगली, मिरज ही दोन्ही शहरे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहेत. व्यापार, शेती, लघु उद्योग, खते, बी बियाणे, कृषीमाल, बेदाणे, हळद, द्राक्ष इ. प्रमुख शेतमाल आणि त्यावर आधारित व्यापार उदीम उलाढाल या दोन्ही शहरातून होते.

या शहरातील महापालिकेने किमान रस्ते चांगले दिले तर जनतेचे हाल कमी होतील. मिरज एस टी स्टँड, रिक्षा स्टँड येथील रस्त्याची दुरावस्था अतिशय गंभीर आहे. रिक्षा, बसेस, कार मधून जाणारे प्रवासी हाडे खिळखिळी होतील या भयाने वाहने हळूहळू चालवतात, असेही चालक म्हणतात.

रिक्षाचालक मारू दर्यावर्दी म्हणाले की, गेली चार वर्षे रिक्षा चालवतो आहे. इथे पॅच मारून रस्ते दुरुस्त करतात. मिरजेतील रस्त्यांचे  लवकरात लवकर डांबरीकरण झाले तर आमचा मेंटेनन्स, ब्रेकडाऊन खर्च कमी होईल. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सारखे सुंदर रस्त्यांची आम्हाला स्वप्ने पडतात. खड्ड्यामुळे चासी क्रॅक होते, टायर खराब होतात. रिक्षा व्यवसायावर आता प्रपंच चालवणे अवघड झाले आहे.

कंडक्टर मुनीर सुतार म्हणाले की, सांगली, मिरज येथून पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नाशिक, नगर, धुळे, जळगाव ई मोठ्या शहरात महामंडळाची वातानुकूलित, शिवशाही, रातराणी बससेवा आहे. आमच्या बससेवेचा प्रवाशांना आनंद मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने दर्जेदार रस्ते निर्माण करावेत. बसेसचा ब्रेकडाऊन कमी होईल.

तर प्रवासी शैलजा आणि अरुणा पानशेट्टी म्हणाल्या की, आम्ही कराड येथून माहेरी जमखंडी, कर्नाटक येथे माहेरी गेलो होतो. मिरज, सांगली मार्गे कोणताही प्रवास नकोसा होतो. इतके खड्डे या शहरात आहेत. शहरातील रस्ते दुरुस्ती करावी, अशी आमची विनंती आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय