पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शब्दधन काव्यमंच यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ठीक चार वाजता ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे श्यामची आई कृतज्ञता सोहळा संपन्न होणार आहे.ज्येष्ठ कवयित्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ती राधाबाई वाघमारे यांना (श्यामची आई) आणि त्यांचे सुपुत्र उद्योजक प्रवीण वाघमारे यांना (श्याम) डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून टाटा मोटर्समधील निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) कार्यवाह उद्धव कानडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची स्वागताध्यक्ष म्हणून सोहळ्यात प्रमुख उपस्थिती राहील. या सोहळ्यामध्ये वैज्ञानिक डॉ. भरत पाडेकर (सानेगुरुजी विचारसाधना), सुनीता नागरे आणि संदीप वाघोले यांना (सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा) तसेच निवृत्त शिक्षिका शोभा जोशी यांना (सानेगुरुजी संस्कारक्षम शिक्षिका) पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
या सोहळ्यात ‘शब्द शिवार’ (प्रथम), ‘साहित्य स्वानंद’ (द्वितीय), ‘शुभम्’ (तृतीय) आणि ‘नदी’ (बालसाहित्य – विशेष) या अंकांना पद्मश्री नारायण सुर्वे दिवाळी अंक स्पर्धा २०२२ अंतर्गत पारितोषिके प्रदान करण्यात येतील. यावेळी पंतप्रधान श्रमश्री पुरस्कारविजेते बाजीराव सातपुते यांचे ‘आईच्या संस्कारांतून घडलेले सानेगुरुजी’ या विषयावरील व्याख्यान होईल. विनाशुल्क असलेल्या या सोहळ्याचा सर्व नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन पुरुषोत्तम सदाफुले आणि सुरेश कंक यांनी केले आहे.



